
लातूर: कृषि महाविद्यालय, विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लातूर, एडिएम एग्रो इंडस्ट्रीज व एसएमएल यांच्या संयुक्त विद्यमाने “शाश्वत कृषि विकासासाठी रासायनिक शेतीचे टप्प्याटप्प्याने एकात्मिक शेतीकडे संक्रमण” या विषयावर प्रशिक्षकांना एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे, प्रमुख मार्गदर्शक प्रा. अश्रोबा जाधव, तर प्रमुख पाहुणे डॉ. व्यंकट जगताप, डॉ.अच्युत भरोसे, अमोल ढवण व वशीष्ट घुले उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब ठोंबरे म्हणाले कि हवामान बदलामुळे शेतीमध्ये होणारे जलद संक्रमनात पिकांना तग धरून राहण्यासाठी शेतकरी, शास्रज्ञ, कृषि निविष्ठा उत्पादक, विद्यार्थी व धोरणकर्ते यांचा सुसंवाद असणे आवश्यक आहे. ते पुढे असे म्हणाले कि, मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे अनुभव व नाविन्यपूर्ण कृषि तंत्रज्ञान यास कृत्रिम बुद्धीमत्तेची सांगड घालणे क्रमप्राप्त आहे. तसेच नवनिर्मित तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षणातून कालानुरूप शिक्षण व व्यवसायामधील बदल आत्मसात करणे गरजेचे आहे. या प्रशिक्षणास ३० प्रशिक्षकांनी सहभाग नोंदविला. या प्रशिक्षकांद्वारे सोयबीन, तूर, हरबरा, ऊस, कापूस ई. पिकासाठी मराठवाड्यातील दिड लक्ष शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे यातूनच शेतकरी स्वावलंबी होण्यास मदत होईल. याप्रसंगी अमोल ढवण, प्रा. अश्रोबा जाधव, वशीष्ट घुले यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विजय भामरे, सूत्रसंचालन दयानंद माने, तर आभार प्रदर्शन डॉ. अच्युत भरोसे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.योगेश भगत, अतुल मानकर, बिभिषण शिनगारे व नितीन मल्लापल्ले यांनी विशेष परिश्रम घेतले.

