
समाजात असे काही लोक असतात ज्यांच्या कार्यामुळे माणुसकी अजूनही जिवंत आहे, हे जाणवते. रामभाऊ हे असेच एक सेवाभावी व्यक्तिमत्त्व. त्यांनी हजारो गरजू रुग्णांना मदतीचा हात दिला आहे. अशाच एका प्रसंगात, 53 वर्षीय हनुमंत समुखराव (उर्फ बापू) यांना आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्यांच्यावर विनामूल्य बायपास सर्जरी होण्यात रामभाऊंचा मोलाचा वाटा राहिला.
बापू गेली 30 वर्षे रेड्डी कन्स्ट्रक्शनमध्ये प्रामाणिकपणे काम करत होते. संसाराचा गाडा ओढताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झाले आणि अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे आयुष्य संकटात सापडले. लातूरमधील कवठाळे हॉस्पिटलमध्ये अँजिओग्राफी केल्यानंतर डॉक्टरांनी बायपास सर्जरीची गरज असल्याचे सांगितले. मात्र, या सर्जरीचा प्रचंड खर्च बापूसाठी परवडणारा नव्हता.
त्याचवेळी कोणीतरी त्यांना रामभाऊंच्या सेवाभावी कार्याची माहिती दिली. त्यांनी त्वरित रामभाऊंशी संपर्क साधला आणि पुढे काय घडले हे मन भारावून टाकणारे आहे. रामभाऊंनी बापूंचे मुंबईतील नामांकित बालाजी हॉस्पिटल मध्ये विनामूल्य उपचार करण्याची व्यवस्था केली. एक रुपयाही न घेता ही बायपास सर्जरी यशस्वीरीत्या पार पडली आणि आज बापू पुन्हा नव्या जोमाने आयुष्याकडे पाहू लागले आहेत.
आज डिस्चार्ज मिळाल्यानंतर बापूंच्या चेहऱ्यावरचा आनंद शब्दांत सांगता येणार नाही. आयुष्यभर कष्ट करूनही आर्थिक अडचणींमुळे आरोग्याची काळजी घेता न येणाऱ्या लोकांसाठी रामभाऊंनी निर्माण केलेली ही सेवा म्हणजे देवदूताचीच भूमिका आहे.
रामभाऊंनी आजपर्यंत तब्बल साडेतीन हजार गरजू लोकांना मोफत उपचार मिळवून देण्याचे महान कार्य केले आहे. हा प्रवास थांबणारा नाही, कारण त्यांच्या मनात एकच संकल्प आहे— “जोपर्यंत आयुष्य आहे, तोपर्यंत ही सेवा अखंडित सुरू राहील!”
या महान सेवेला माझा मनःपूर्वक प्रणाम!
- दिपरत्न निरंकार , संपादक दैनिक युतीचक्र लातूर cell.77220 75999

