
(दिपरत्न निलंगेकर) | १० ते १४ मार्च | महाराष्ट्र
होळी हा रंगांचा आणि आनंदाचा सण आहे, मात्र सध्या त्याचा विपरीत परिणाम पर्यावरणावर होत आहे. झाडांची तोड, पाण्याचा प्रचंड अपव्यय, रासायनिक रंगांचा वापर आणि प्रदूषणामुळे होळीचा सण निसर्गासाठी धोकादायक ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विविध शाखांमार्फत “पर्यावरणपूरक होळी अभियान” राबवण्यात येत आहे.
या अभियानाअंतर्गत नागरिकांना पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यात खालील गोष्टींवर विशेष भर देण्यात आला आहे—

✅ होळी मोठ्या प्रमाणात जाळण्याऐवजी प्रतीकात्मक होळी पेटवा.
✅ झाडे तोडण्याचे टाळा आणि उपलब्ध वाळक्या फांद्या किंवा शेणाच्या गोवऱ्यांचा वापर करा.
✅ होळीमध्ये पोळी जाळण्याऐवजी ती गरजूंना दान करा.
✅ बोंबा मारणे, अश्लील भाषा वापरणे यासारख्या अनिष्ट प्रथा थांबवा.
✅ रंगपंचमीला घातक रासायनिक रंग, पाण्याचे फुगे आणि पाण्याचा अपव्यय टाळा.
✅ नैसर्गिक आणि पर्यावरणस्नेही रंगांचा वापर करा.
“होळी लहान करा, पोळी दान करा” हा संदेश देत अनेक गावांमध्ये आणि शाळांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी एकच सामूहिक होळी उभारून इंधनबचत केली जात आहे. या उपक्रमात स्थानिक नागरिक, विद्यार्थी, शिक्षक आणि सामाजिक संस्था सक्रिय सहभाग घेत आहेत.

याबाबत बोलताना अभियानातील कार्यकर्ते सांगतात, “सण आनंदाने साजरा करायचा असतो, पण तो निसर्ग आणि समाजाच्या भल्यासाठी असावा. हीच खरी संस्कृती आहे!”
या मोहिमेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात पर्यावरणपूरक होळीची चळवळ अधिक जोमाने वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
🌿 “सण संस्कृती जपूया, निसर्ग वाचवूया!”

