
लातूर, दि. १५ – दंत आरोग्याविषयी समाजात जागृती व्हावी याकरिता एमआयडीएसआर दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या वतीने लातूर तालुक्यातील ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविका यांच्यासाठी मंगळवार, दि. १८ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत एमआयटी लातूर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सभागृह येथे दंत आरोग्य प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या दंत प्रशिक्षण मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लातूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रामराव पवार तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमआयडीएसआर दंत महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक डॉ. हनुमंत कराड हे उपस्थित असणार आहेत. या मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयाचे रुग्णालय अधिक्षक डॉ. एकनाथ माले, मुख औषधशास्त्र व क्ष – किरण शास्त्र तज्ज्ञ डॉ. अभय कुलकर्णी, बाल दंत रोग तज्ज्ञ डॉ. प्राजक्ता गायकवाड, एमआयपी फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या डॉ. शितल घुले, एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयातील नेत्र रोग विभागातील डॉ. आयुषा सावंत हे तज्ज्ञ उपस्थित आशा स्वयंसेविका यांना मार्गदर्शन करणार आहेत.
या आशा स्वयंसेविका प्रशिक्षण मेळाव्यासाठी लातूर तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्व आशा स्वयंसेविका यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन एमआयडीएसआर दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश कांगणे व उप प्राचार्य डॉ. यतिशकुमार जोशी यांनी केले आहे.

