
लातूर : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि भारत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जयक्रांती महाविद्यालयती राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विद्यापीठस्तरीय युवती नेतृत्व विकास कार्यशाळा 2024-25 आयोजित करण्यात आली. या युवती कार्यशाळेत विद्यापीठातील विविध महाविद्यालयातून 120 मुलींनी सहभाग नोंदविला. या शिबिरात डिजिटल साक्षरता या विषयावरील सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संदीपान जगदाळे यांचे मार्गदर्शन झालं. डिजिटल साक्षरते विषयी बोलताना म्हणाले की, १९३० च्या दशकात युद्ध प्रचारामुळे आणि १९६० च्या दशकात जाहिरातींच्या वाढीमुळे अनुक्रमे युनायटेड किंग्डम आणि युनायटेड स्टेट्समध्ये संगणक साक्षरता शिक्षण सुरू झाले. भारताला डिजिटली सक्षम समाज आणि ज्ञान अर्थव्यवस्थेत रूपांतरित करावे, ऑनलाइन पायाभूत सुविधा सुधारून आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी वाढवून नागरिकांना सरकारी सेवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने उपलब्ध करून द्यावा या प्रमुख उद्देशाने १ जुलै २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडिया मिशन सुरू केले. संगणक किंवा डिजिटल ऍक्सेस उपकरणे चालविण्याचे प्रशिक्षण दिल्याने दैनंदिन जीवनात सुकर होईल.

त्यामुळे राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवकांनी ग्रामीण भागात जाऊन डिजिटल साक्षरतेचा प्रचार करावा. जेणेकरून भारत लवकरच महासत्ता होईल असे प्रतिपादन राष्ट्रीय सेवा योजना+२ स्तर विभागीय समन्वयक डॉ.संदीपान जगदाळे यांनी केले.
डॉ संदीपान जगदाळे यांनी आधार, डिजिटल लॉकर, भीम यूपीआय, भारतनेट, ई-नाम, राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल, स्मार्ट सिटीज मिशन, उमंग अॅप, डिजिटल इंडिया पोर्टल, स्वयंम, ई-साइन फ्रेमवर्क, डिजीलॉकर, मायगव्ह, स्वयंम आदी विविध योजनांची माहिती दिली. तसेच समाज माध्यमे हाताळताना कोणते धोके आहेत ते सांगून दक्षता कशी घ्यावी याबाबत जागृती केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.हरिश्चंद्र चौधरी होते ते म्हणाले की, “तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केला. तंत्रज्ञान क्रांती करण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. अमेरिकेने आपल्या देशाला सुपर कॉम्प्युटर देण्यास नकार दिला होता. त्यामुळे डॉ. विजय भटकर यांनी स्वतः संगणक तयार केला हा क्षण भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला. प्रास्ताविक डॉ. प्रमोद चव्हाण यांनी केले. यावेळी शाहीर संदीप जगदाळे यांनी छ. शिवाजी महाराज यांच्या जन्मावरील पोवाडा सादरीकरण केले आणि विद्यार्थिनींच्या मनामध्ये नेतृत्व गुण विकसित करण्याला दीपस्तंभ निर्माण केला, सूत्रसंचालन प्रा. प्रज्ञा कांबळे यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ.सतीश डांगे यांनी केले. कार्यक्रमासाठी शिबीर संयोजक व रा. से. यो. जिल्हा समन्वयक डॉ.केशव अलगुले, डॉ. निलंगेकर शरण, डॉ. गीता वाघमारे, डॉ. समिना शेख, प्रा. प्रज्ञा स्वामी, आदी प्राध्यापक उपस्थित होते.

