
ला.दि. २६ विद्यार्थ्यांत वाचनाची आवड निर्माण व्हावी व वाचन संस्कृती जोपासली जावी यासाठी दयानंद कला महाविद्यालयातील प्रा. डॉ. संदीपान जगदाळे हे विविध उपक्रम राबवित असतात. त्याचाच एक भाग म्हणून ते मागील १४ वर्षांपासून जो विद्यार्थी वर्षभरात अभ्यासेत्तर सर्वाधिक साहित्यिक पुस्तकांचे वाचन करून आपली बौद्धिक क्षमता विकसित करेल त्याला रु १०५१/- व प्रशस्तीपत्र देऊन वार्षिक स्नेहसंमेलनात सन्मानित करीत असतात.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या वर्षीची उत्कृष्ट वाचक म्हणून इयत्ता अकरावीत शिकणारी कु. पौर्णिमा मस्के ही मानकरी ठरली. तिने चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता अकरावीचा अभ्यास करत असताना २१४ अवांतर पुस्तकांचे वाचन केले आहे व त्याचे नोंदवहीत सारांश रूपाने संकलन केले आहे. वाचनामुळे मला साहित्याचा निखळ आनंद घेता आला असे मनोगत कु. पौर्णिमाने व्यक्त केले.
इतरांपेक्षा कमी गुण प्राप्त केले तर न्यूनगंड निर्माण होतो तर अधिक गुण प्राप्त केले तर अहंकार निर्माण होतो. त्यामुळे इतरांशी स्पर्धा व तुलना न करता स्वतःशीच स्पर्धा निर्माण करावी यासाठी यांनी मागील बारा वर्षांपासून प्रा. डॉ संदीपान जगदाळे यांनी ‘स्वगुण वाढ पारितोषिक योजना’ सुरू केली आहे.

या स्पर्धेत इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत जे गुण प्राप्त केले आहेत त्यापेक्षा इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेत ज्याने सर्वाधिक गुणांची वाढ केली आहे त्यांना डॉ.संदीपान जगदाळे यांच्या कडून रु १०००/- व प्रशस्तीपत्र पत्र देऊन स्नेहसंमेलनात प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते गैरव केला जातो.
यावर्षी ‘स्वगुण वाढ परितोषिक’ कु.ब्रह्मकुमारी भोसले हिने प्राप्त केले आहे. तिला इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत ६७.२०% गुण होते त्यानंतर तिने फेब्रुवारी २०२४ च्या बोर्ड परीक्षेत ८२.५०% गुण संपादन केले. अशारितीने तिने १५.०३ % गुणांची स्वागुणवाढ केली. या योजनेमुळे माझा आत्मविश्वास वृद्धिंगत झाल्याचे ब्रह्मकुमारिने सांगितले.
या दोन गुणी विद्यार्थिनींचा सन्मान वार्षिक स्नेहसंमेलनाचे प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध लेखक अरविंद जगताप व उदयोन्मुख गायक कलावंत अभिजीत जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य डॉ.शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य डॉ.अंजली जोशी, उपप्राचार्य डॉ दिलीप नागरगोजे, पर्यवेक्षक डॉ.प्रशांत दीक्षित, डॉ.रमेश पारवे, कार्यालयीन अधीक्षक संजय व्यास व डॉ. संदीपान जगदाळे हे उपस्थित होते.

