
लातूर: महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेल्या देशिकेंद्र विद्यालयाच्या भरती प्रक्रियेत लातूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी मोठा घोटाळा केल्याचे उघड झाले आहे. सेवानिवृत्त मुख्याध्यापिका एस. के. कल्याणी यांनी नियमबाह्य भरती करून शासनाची फसवणूक केली असून, यामध्ये जिल्हा परिषद शिक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचारी संगनमताने सामील असल्याचा गंभीर आरोप आहे.
बनावट प्रस्ताव, बोगस स्वाक्षऱ्या आणि फसवणूक!
कल्याणी एस. के. या ३१ जुलै २०२१ रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांनी बेकायदा नोकर भरती केली. त्यांच्या स्वाक्षरीने स्नेहलकुमार खुडे यांच्या सेवकपदाचा प्रस्ताव सादर केला, जो पूर्णतः बोगस होता. एवढेच नव्हे, तर शिक्षण विभागानेही या बनावट प्रस्तावाला पाठिंबा देत त्यांना सेवाश्रेणी मान्यता दिली.
शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचेही हात रक्ताने माखले!
संस्थेच्या अध्यक्ष आणि सचिवांना वगळून मुख्याध्यापिकेनेच भरती करण्याचा ‘फंडा’ राबवला गेला. विशेष म्हणजे, २०१६ मध्ये अवघ्या १७०० रुपयांवर नियुक्त केलेल्या स्नेहलकुमार खुडे यांना २०१९ मध्ये सेवासातत्य देऊन वेतनश्रेणीत टाकण्यात आले. यात माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांचीही संपूर्ण संमती होती.
सर्व संबंधितांवर गुन्हे दाखल करा!
सेवानिवृत्त सहाय्यक प्रकल्प अधिकारी विठ्ठल महापुरा भोसले यांनी हा घोटाळा उघडकीस आणत सर्व संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी याप्रकरणी कोणती कठोर कारवाई करतात, याकडे संपूर्ण लातूरचे लक्ष लागले आहे.
हा भ्रष्टाचार उघड झाल्यानंतर लातूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे…

