
“प्रभू श्रीराम हेच मानवासाठी आचार व विचाराचे सर्वोत्तम प्रतीक आहेत. त्यांचं जीवन हेच आपल्यासाठी प्रेरणास्थान आहे,” असे प्रतिपादन ह.भ.प. ज्ञानेश्वर जवळे महाराज यांनी केले. श्री राम मंदिर, जळकोट रोड, उदगीर येथे आयोजित प्रवचन सेवेत ते बोलत होते.

श्रीराम मंदिर जळकोट रोड उदगीर येथे राम मंदिर जन्मोत्सव समितीतर्फे आयोजित प्रवचन कार्यक्रमात महाराजांनी उपस्थित भाविकांना संबोधित करताना सांगितले की, “आई-वडिलांचा आदर करणे म्हणजेच खरी श्रीराम भक्ती होय. मानवाने जीवनात प्रत्येक क्षणाला भगवंताच्या नामस्मरणात राहावे, तरच आत्मकल्याण शक्य आहे. मनातील काम, क्रोध, लोभ, मोह या राक्षसी वृत्तींचा त्याग करून आपणही रामरूप होऊ शकतो.”

“प्रत्येकामध्ये एक राम आहे, तो ओळखणे आवश्यक आहे,” असा संदेश देत त्यांनी उपस्थितांना आध्यात्मिक प्रेरणा दिली.
या कार्यक्रमासाठी राम मंदिर जळकोट रोड येथील विश्वस्त अजय दंडवते, मेघशाम कुलकर्णी, प्रमोदराव कुलकर्णी, यशवंत बारस्कर, नागनाथराव कोंडेकर, गोपाळ जोशी, छाया जोशी, सुनीती दंडवते, माधव घोणे यांनी विशेष मेहनत घेतली.
प्रवचनानंतर गुलाल उधळण्याचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर आरती आणि पाळणा गीत गायनाने कार्यक्रमाची मंगलमय सांगता झाली. कार्यक्रमास उदगीर व परिसरातील अनेक भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

