
लातूर | ७ एप्रिल २०२५ :
लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुढील वैद्यकीय उपचारासाठी मुंबईतील कोकिळा बेन हॉस्पिटल येथे हलविण्यात येणार आहे. त्यांच्या मेंदूच्या काही भागातील संवेदना कमी झाल्याचे निदर्शनास आले असून, त्यावर तातडीने उपचार आवश्यक असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

आज साडेदहा ते अकराच्या दरम्यान, एअर ॲम्बुलन्सद्वारे त्यांना लातूर विमानतळावरून मुंबईकडे रवाना करण्यात येणार आहे. सह्याद्री हॉस्पिटलचे वरिष्ठ डॉक्टर हनुमंत किनीकर यांनी या माहितीची पुष्टी केली आहे.

आयुक्त मनोहरे यांची प्रकृती पाहता, वेळेचे महत्व ओळखून लातूर शहरातून विमानतळापर्यंत हॉस्पिटलपासून ग्रीन कॉरिडोर तयार करण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांनी यासाठी आवश्यक ती संपूर्ण यंत्रणा तातडीने उभी केली आहे. अकरा वाजता लातूरहून अधिकृतपणे एअर ॲम्बुलन्सने प्रस्थान होणार आहे.

लातूरकर आणि महापालिकेतील अधिकारी-कर्मचारी त्यांच्या प्रकृतीबाबत चिंतेत असून, अनेकांनी त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना सुरू केल्या आहेत. लवकरच अधिकृत वैद्यकीय बुलेटिन प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.
संपूर्ण लातूर शहरातून त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली जात आहे.

