
महावितरणच्या वतीने डॉ.आंबेडकरांची जयंती उत्सहात साजरी
लातूर, ता.१५ एप्रिल: डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य हे कोण्या एका जातीसाठी किंवा एखाद्या प्रदेशापुरते मर्यादीत नव्हते, ते सर्वव्यापी स्वरूपाचे होते. अवघ्या जगाला मार्गदर्शन करणार काम बाबासाहेबांनी केलं आहे. बाबासाहेब हे एकमेव महापुरूष असे आहेत की, ज्यांना सर्व जग स्विकारू इच्छित आहे. जगभर साजऱ्या होणाऱ्या जयंती उत्सवावरून आपणास याची प्रचिती येतेय असे विचार प्रा.बापू गायकवाड यांनी व्यक्त केले.
महावितरणच्या वतीने मुख्य अभियंता अरविंद बुलबुले, सहाय्यक अभियंता शिलरत्न सुर्यवंशी, राहूल गाडे, श्री सुळ, श्री स्वामी यांच्या प्रमूख उपस्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त विद्यूत भवन येथे आयोजीत जयंती उत्सवात प्रा.बापू गायकवाड बोलत होते. ते पुढे म्हणाले की, बाबासाहेबांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेतले. पिढ्यानपिढ्या माणूसपणा पासून वंचीत राहिलेल्या समाजाला माणूसपण मिळवून देण्यासाठी आवश्यक असलेल्या ज्ञानाची उपासना केली. ज्ञान, शिल आणि स्वाभिमान ही तीन दैवतं बाबासाहेबांनी मानली. याच्या उपासने द्वारेच प्रचंड ज्ञान मिळवून संविधानाची निर्मिती करून तुम्हा-आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. आपण आपल्या महापुरूषांकडे कसं पाहतो याची एक चुकीची धारणा आपल्या मेंदूमध्ये रूजवली आहे. प्रत्येक महापुरूषाला जातीचे लेबल लावून त्यांना एका जातीपुरतं मर्यादीत करून टाकलं आहे. ही धारणा आता कुठे तरी बदलायला हवी. वर्तमानातील परिस्थिती पाहता मार्गदर्शक ठरणारे महापुरूषांचे विचार हे जगातील प्रत्येकाला प्रेरणादायी ठरणार आहेत. कोलंबिया विद्यपीठाने सिंबाॅल ऑफ नॉलेज ने गौरविलेले बाबासाहेब आज जगाकडून शिकण्याची वेळ आपल्यावर आली आहे असे सांगत, प्रा.गायकवाड म्हणाले की डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बुध्द आणि त्यांचा धम्म या ग्रथांद्वारे केलेला उपदेश हा तुमचे , तुमच्या कुटूंबाचे, तुमच्या समाजाचे जीवन सुखकारक करणारा आहे. बाबासाहेबांनी बौध्द धम्मातून दिलेला पंचाग पंचशिलाचा विचार हा तुम्हा-आम्हाला समृध्द करणारा, सम्यक विचारांची मांडणी करणारा आहे. बुध्द , कबीर, संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले तसेच अनेक संतांच्या वाचाराने प्रेरित झालेले बाबासाहेब यांचे समग्र जीवन आपल्याला, येणाऱ्या पिढीला नवी दृष्टी देणारे आहे असेही प्रा.बापू गायकवाड यांनी विचार व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपाचे विचार व्यक्त करताना लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद बुलबुले म्हणाले की, डॉ. आंबेडकरांचे संपुर्ण जीवनच प्रेरणादायी आहे. जयंतीच्या निमित्ताने बाबासाहेबांचे विचार आपण आत्मसात केले.आपल्या दैनंदिन आचरणात आणले तरच खऱ्या अर्थाने जयंती उत्सवा निमित्ताने अभिवादन केल्याचे सार्थक ठरेल.
जयंती उत्सव कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रमोद कांबळे यांनी केले तर प्रास्ताविक सहाय्यक अभियंता शिलरत्न सुर्यवंशी यांनी केले. तसेच एस.यु.कुसभागे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशश्वितेसाठी जयंती उत्सव समितीचे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

