
लातूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात सध्या गोंधळाचे वातावरण आहे. शिक्षण अधिकारी श्री. नागेश मापारी यांच्यावर गंभीर आरोप होत आहेत. चार दिवसांपूर्वी काही स्थानिक वृत्तवाहिन्यांनी या विभागातील अनागोंदी कारभारावर प्रकाश टाकत अनेक धक्कादायक बाबी उघड केल्या. यामध्ये बाहेरील अनधिकृत व्यक्ती कार्यालय चालवताना दिसत असल्याचा आरोप आहे.
या अनधिकृत व्यक्तींकडे कार्यालयातील संगणकांचे पासवर्ड असून, त्यांच्याच माध्यमातून सर्व फाईली तयार केल्या जातात. आश्चर्याची बाब म्हणजे या व्यक्तींच्या अस्तित्वाची माहिती खुद्द कार्यालयाच्या अधीक्षकांनाही नसल्याचे समोर आले आहे. यावरून असे स्पष्ट होते की श्री. मापारी यांचे कार्यालयावर कोणतेही नियंत्रण उरलेले नाही.
‘नेटिझन्स’ शाळेचा अड्डा!
श्री. मापारी हे कार्यालयात क्वचितच दिसतात. माहितीच्या अनुसार, ते अधिक वेळ ‘नेटिझन्स’ शाळेत बसून शिक्षण विभागाचा कारभार चालवत आहेत. ही बाब अनेकांच्या चर्चेचा विषय बनली आहे. कार्यालयात न बसण्याचे कारण काय, यावर अद्याप कोणतीही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
मनमानी निर्णयांची मालिका
लातूरमध्ये तीन वर्षांपासून कार्यरत असलेले मापारी यांनी अनेक निर्णय नियमबाह्य घेतल्याचा आरोप आहे. शाळांमधील व्यवस्थापनातील वादाचा फायदा घेत त्यांनी खाजगी हितसंबंध जपत अनेक प्रकरणांमध्ये मनमानी केली आहे. अण्णाभाऊ साठे शाळेतील शिक्षिका ज्योती तेलंगे यांचे वेतन कोणतीही नोटीस न देता थांबवण्यात आले, हे त्याचे एक उदाहरण आहे.
बोगस भरतीप्रकरणात सहभाग?
सध्या गाजत असलेल्या महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेतील बोगस भरती प्रकरणातही मापारी यांचे नाव चर्चेत आहे. संस्थेतील अंतर्गत भांडणाचा फायदा घेत त्यांनी भरतीस मान्यता दिल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे, यात त्यांच्या आणि इतर काही अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांची भरती झाल्याची चर्चा आहे.
सामान्य नागरिकांचे हाल
कार्यालयात नियमितपणे न हजर राहणारे मापारी सामान्य नागरिकांसाठी ‘अदृश्य’ अधिकाऱ्याचे रूप घेत आहेत. कार्यालयात वारंवार येऊन देखील त्यांना भेट मिळत नाही, आणि त्यामुळे त्यांची कामे रखडली आहेत.
अनियमित कामकाज व खास गट
मापारी यांच्यावर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या बॅक डेटेड मान्यता, विनाअनुदानित शिक्षकांचे अनुदानावर समायोजन, बोगस कागदपत्रांच्या आधारे मान्यता देणे अशा गंभीर प्रकारच्या अनियमिततेचे आरोप आहेत. त्यांच्या गटात ठराविक दलाल व ठेकेदारांचा प्रभाव दिसून येतो. अहमदपूर येथील सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या शाळेतील कर्मचारी कैलास क्षिरसागर, संजय बनसोडे यांचे नाव तसेच मनोज कन्नाडे या कार्यकर्त्याचे नावही पुढे येत आहे. हे सर्वजण शिक्षक असूनही ‘दलाली’ करण्यातच धन्यता मानत असल्याचे बोलले जाते.
कारवाई होणार का?
या सर्व प्रकारांमुळे शिक्षण विभागाची प्रतिमा धुळीस मिळत आहे. नागेश मापारी यांच्यावर कारवाई होणार की नाही, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून आहे. जनतेमध्ये प्रचंड असंतोष असून, प्रशासनाने याची गंभीर दखल घेणे गरजेचे झाले आहे.

