
_सूर्यकांत लोखंडे, कृषी पर्यवेक्षक, लातूर
डिजिटल तंत्रज्ञानाचा आता जवळपास प्रत्येक क्षेत्रात वापर होऊ लागला आहे. त्यामुळे अनेक गोष्टी सहजसोप्या तर झाल्याच, शिवाय त्याचा आपल्या सर्वांना फायदाही झाला. अशाच प्रकारे कृषी क्षेत्रातही विविध डिजिटल तंत्राचा वापर केला जात आहे. त्याचेच पुढचे पाऊल म्हणजे ॲग्रीस्टॅक. देशभरातील शेतकऱ्यांना डिजिटल ओळख क्रमांक देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा घटक असलेल्या कृषी क्षेत्रात काळानुरूप बरेच बदल होताना आपण पाहतो. शेतीसह शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी केंद्रासह राज्य सरकारकडून विविध योजना, धोरणे राबविली जातात. काही योजना कागदावर चांगल्या दिसतात, तर काही योजनांचा शेतकऱ्यांना चांगला फायदाही होतो, काही योजनांचा लाभ मिळतही नाही. काही ठिकाणी तर शेतकऱ्यांच्या नावावर दुसराच व्यक्ती लाभ घेतो किंवा एकच लाभार्थी अनेक योजनांचा लाभ घेतो. अशा योजनांच्या नावाखाली अनेक गैरप्रकारही होतात. त्याला आळा घालण्यासाठी आणि प्रत्येक शेतकऱ्यांची विशिष्ट ओळख व्हावी, तसेच कृषी क्षेत्रातील विविध भागधारकांना एकत्रित आणत डेटा आणि डिजिटल सेवांच्या मदतीने शेतकऱ्यांना अनेक सेवा-सुविधा देण्यासाठी केंद्र सरकारने विविध राज्य सरकारच्या मदतीने ॲग्रीस्टॅक हा डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित केला.
कोणत्याही क्षेत्रात काम करीत असताना पूर्वानुभव हा अत्यंत महत्त्वाचा असतो. त्या क्षेत्राची सविस्तर माहिती, त्यातील आकडेवारी, फायदे-तोटे, अडी-अडचणीबाबत माहिती असल्यास पुढील वाटचाल सोपी जाते. त्याप्रमाणे केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वतीने 'इनआयडिया 2.1'' या मॉडेलअंतर्गत कृषी मंत्रालयाने देशभरातील कृषी क्षेत्राच्या एकंदरीत विकासासाठी ॲग्रीस्टॅक हा नवा कोरा डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित केला. प्रत्येक राज्याला केंद्रस्थानी ठेवून, कृषीविषयक विविध योजनांना थेट शेतकऱ्यांना लाभ देता यावा, कृषी क्षेत्रातील विविध भागीदारांना एकत्र आणत

सर्वसमावेशक संरचना ॲग्रीस्टॅकमध्ये देण्यात आली आहे. ॲग्रीस्टॅक ही एक राष्ट्रीय स्तरावरील डिजिटल पायाभूत सुविधा असून, त्यात कृषी क्षेत्राशी संबंधित सर्व माहिती एकत्र केली जाणार आहे. शेतकऱ्यांची आधार कार्डशी जोडलेली माहिती, शेतीच्या नोंदणीचे तपशील, पीक लागवडीचा डेटा शेतीमाल खरेदी आणि विक्रीची माहिती, वित्तीय व्यवहार आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याच्या विविध मुद्द्यांचा ॲग्रीस्टॅक मध्ये समावेश असणार आहे.

उपक्रमाचा उद्देश काय ?
1.सरकारच्या विविध योजना, अनुदान, आर्थिक मदत थेट योग्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी.
- प्रत्येक शेतकऱ्याला स्वतंत्र ओळख क्रमांक (डिजिटल फार्मर आयडी) मिळावा.
- शेतकऱ्यांना पीककर्ज, वित्तीय सहाय्य, कृषी निविष्टा सहज उपलब्ध व्हाव्यात. 4. शेतीविषयक विविध योजना आणि उपक्रमांसाठी केंद्र आणि विविध राज्य सरकारमध्ये दुवा निर्माण व्हावा. 5. कृषी विषयक विविध माहिती, संशोधन तसेच अन्य डेटा उपलब्ध करणे.
ॲग्रीस्टॅकमध्ये काय आहे ? 1. शेतकरी नोंदणी: यामध्ये शेतकऱ्यांची आधार कार्डशी जोडलेली माहिती, जमीन हक्कपत्र, सातबाराविषयक माहिती आणि शेतातील विविध पिकांच्या नोंदीचा
समावेश आहे. 2. पीकपेरणी नोंदणी: शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात कोणकोणत्या पिकांची पेरणी केली, कोणकोणती खते वापरली ही माहिती समाविष्ट असेल. 3. शेतीविषयक माहिती: शेतकऱ्यांच्या जमिनीचा नकाशा, भौगोलिक माहिती आदींचा समावेश असेल. 4. ई-नामशी जोडणी: राष्ट्रीय कृषी बाजारपेठ असलेल्या ई-नाम प्रणालीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीमाल ऑनलाइन विकण्याची सोय व्हावी.
पुढील टप्प्यात स्वतः नोंदणी करता येणार
सध्या ॲग्रीस्टॅकसाठी नोंदणीचे काम सेतू केंद्रावर केले जात आहे. पुढच्या टप्प्यात थेट शेतकऱ्यांना स्वतःच नोंदणी करण्याची सोय उपलब्ध होणार आहे. त्यानुसार ॲग्रीस्टॅकच्या पोर्टलवरून शेतकऱ्यांना स्वतः नोंदणी करता येईल. राज्यात एक कोटी 71 लाख शेतकरी खातेदार आहेत. त्यापैकी आतापर्यंत एक कोटी शेतकऱ्यांना ओळख क्रमांक दिले आहे.

‘डेटा सुरक्षित राहावा…
सुलभ, पारदर्शी, आधुनिक तंत्रज्ञान ही ॲग्रीस्टॅक ची वैशिष्ट्ये असली, तरी विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी विविध विभागांमध्ये समन्वयाची आवश्यकता आहे..
केंद्र सरकार आणि राज्यातील विविध विभाग यांच्यातही एकवाक्यता असावी. तसेच या माध्यमातून संकलित होणारी शेतकऱ्यांची माहिती (डेटा) सुरक्षित राहील, पैशाच्या आमिषाने त्याला पाय फुटणार नाहीत, यासाठी
खबरदारी घेणे आवश्यक आहे.
ॲग्रीस्टॅक डेटाबेसचे फायदे
सोयीस्कर कर्ज आणि विमाप्रणाली:
शेतकऱ्यांच्या डिजिटल फार्मर आयडीच्या मदतीने शेतकऱ्यांच्या क्रेडिट स्कोअर तयार करता येईल. त्याद्वारे शेतकऱ्यांना बँकांकडून कर्ज मिळण्याची प्रक्रिया गतिमान होईल, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी वितरण तसेच पीकविमा काढण्यासाठीही ही प्रणाली उपयोगी पडेल.
बाजारपेठेची माहिती:
ॲग्रीस्टॅकद्वारे शेतकऱ्यांना बाजारपेठेतील किंमती, मागणी आणि पुरवठा याबद्दलची माहिती मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल कधी बाजारात न्यायचा आणि कधी विकायचा, याबाबत निर्णय घेता येईल.
कृषीविषयक सल्ला:
विविध पिकांच्या लागवडीपासून ते खते, कीटकनाशके, पाणीपुरवठा आदींबाबत माहिती देईल. त्यासाठी भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगचाही वापर केला जाण्याची शक्यता आहे.
हवामान अंदाज:
ॲग्रीस्टॅकद्वारे शेतकऱ्यांना हवामानविषयक माहिती दिली जाईल. त्याद्वारे शेतक-यांना उपाययोजना करण्यास हातभार लागेल.
संशोधनात्मक माहिती:
कृषी क्षेत्रात होणारे नवनवे संशोधन, नव्या पीकपद्धती, आधुनिक तंत्रज्ञान, देशविदेशातील शेतीविषयक माहिती दिली.
नवतंत्रांची माहिती:
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), मशीन लर्निंग, ब्लॉकचेन, ड्रोन तंत्रज्ञानाचा शेतीच्या विकासाला कसा फायदा होईल, याची माहिती ॲग्रीस्टॅक देईल.
सूर्यकांत लोखंडे, कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी अधिकारी लातूर. 9404681955

