
शिव नगर, पत्रकार रोड (पश्चिम), विवेकानंद पुरम रोड – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झपाट्याने सुरू झालेलं पेव्हर ब्लॉकचं काम निवडणूक संपताच अर्धवट सोडून दिलं गेलं आहे. साधारण ३०० मीटर लांबीचा हा रस्ता केवळ निवडणूक मोहरा बनून राहिलाय, आणि नागरिक मात्र धुळीत, चिखलात रोजच्या यातना सहन करत आहेत.
वाडेकर सरांच्या घरासमोरून जाणाऱ्या या रस्त्याचं काम अगदी जोमात सुरू होतं, पण कामगारांनी मध्येच हात आखडता घेतला. विचारले असता, “बजेट संपलं,” असा सरळसोट उत्तर देण्यात आलं. आश्वासन दिलं गेलं की, “निवडणुकीनंतर बजेट येईल आणि उरलेलं काम पूर्ण होईल.”
आज निवडणुकीलाही महिने उलटले, नविन सरकार स्थापन झालं, अर्थसंकल्पही मंजूर झाला, महापालिकेचा निधीही पास झाला – पण रस्ता मात्र तसाच अर्धवट!

हा प्रश्न आहे: निवडणुकीआधी गाजणारा रस्ता, आता लोकांच्या लक्षातून का गेला?
निवडणुकीच्या नाटकात नागरिकांचा रस्ता गहाण टाकला गेला आहे का?
आता या अर्धवट रस्त्याचा जबाबदार कोण?
आणखी किती दिवस शिव नगरकरांनी धूळ, खड्डे आणि चिखलातच चालत राहायचं?
शासन, प्रशासन, महापालिका – कोणी तरी या प्रश्नाचं उत्तर द्या! नाहीतर शिव नगरमधून विरोधाचा आवाज अधिक तीव्र होईल!

