
लातूर: लातूर जिल्ह्यात करडखेल पाटी येथे झालेल्या भीषण अपघातात तीन माजी सैनिकांचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. बिदरहून लातूरकडे परतणाऱ्या या माजी सैनिकांच्या कारला ट्रकने जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.

मृतांमध्ये यादवराव तुळशीराम काळे (वय ५८, रा. सुगाव, ता. चाकूर), बब्रुवान मारोती मेखले (वय ६२, रा. सुगाव, ता. चाकूर), आणि विठ्ठल बाबुराव यचवाड (वय ५८, रा. अकराई, जि. लातूर) यांचा समावेश आहे. तर हुजूर दुलूखा पठाण (वय ५८, रा. सुगाव, ता. चाकूर) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर लातूर येथे उपचार सुरू आहेत.

अपघात इतका भयंकर होता की कारचा समोरचा भाग अक्षरशः चेंदामेंदा झाला होता. अपघातावेळी बाजूने जाणाऱ्या मोटरसायकलला देखील धक्का बसला असून ग्यानोबा बाबुराव बजगीरे (रा. करडखेल, ता. उदगीर) हे किरकोळ जखमी झाले आहेत.

तिन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन हेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात येत असून, घटनास्थळी व रुग्णालयात मयतांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
– प्रतिनिधी, लातूर

