
लातूर, दि. १६ एप्रिल : दयानंद शिक्षण संस्था लातूर संचलित दयानंद कला महाविद्यालय लातूर चे प्राचार्य डॉ. शिवाजी पांडुरंग गायकवाड यांच्या कार्याचा गौरव करून दयानंद शिक्षण संस्थेने त्यांना तीन वर्ष मुदतवाढ देण्याबाबतचा प्रस्ताव स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड कडे पाठविला मा.कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, डॉ. शैलेंद्र देवळणकर, संचालक उच्च व तंत्र शिक्षण, पुणे, डॉ. किरणकुमार बोंदर सहसंचालक उच्च शिक्षण, नांदेड यांच्या सकारात्मक शिफारसी वरून मा. चंद्रकांत दादा पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई, प्रधान सचिव श्री.बी. वेणूगोपाल रेड्डी यांनी प्रस्तावात शासन मान्यता देवुन मुतदवाढ देण्याबाबात शासन निर्णय निर्गमित केलेला आहे.आता ते वयाच्या 65 व्या वर्षापर्यंत प्राचार्यपदावर कार्यरत राहणार आहेत.
डॉ. शिवाजी गायकवाड यांनी 1993 साली समाजशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून रुजू होऊन शिक्षण क्षेत्रात कार्य सुरू केले. दि.06.08.2019 मध्ये प्राचार्यपदाची धुरा स्वीकारल्यानंतर, त्यांनी महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव कामगिरी बजावली.
दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष अरविंद सोनवणे, ललितभाई शाह, रमेशकुमार राठी, सचिव रमेश बियाणी, संयुक्त सचिव विशाल लाहोटी, सहाय्यक सचिव अँड. श्रीकांत उटगे सहाय्यक सचिव अजिंक्य सोनवणे,कोषाध्यक्ष संजय बोरा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी त्यांच्या कार्यकाळात शैक्षणिक गुणवत्तेतवाढ, नाट्यशास्त्र व मानसशास्त्र विषयांची सुरूवात, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे अभ्यासकेंद्र, तसेच पाच पदव्युत्तर वर्गांना मंजुरी मिळवण्यात आली. तसेच तीन राष्ट्रीय चर्चासत्रांचे आयोजन, करिअर कट्टा पुरस्कार व नॅक मूल्यांकनात ‘अ’ दर्जा मिळवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली.
सांस्कृतिक, क्रीडा, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना आदी क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले असून, विद्यापीठ स्तरीय युवक महोत्सवात सलग तीन वर्षे विजेतेपद मिळवून हॅट्रिक साधण्यात यश मिळवले.
या मुदतवाढीबद्दल दयानंद शिक्षण संस्था संचलित सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व शहरातील नामवंत व प्रतिष्ठित व्यक्तीने सत्कार करून शुभेच्छा दिल्या आहेत.

