राष्ट्रीय शिक्षण धोरणाने शिक्षण क्षेत्राला नवा दृष्टीकोन दिला

लातूर, २२ एप्रिल – येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून लागू होणाऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत शिक्षण प्रणालीचा व्यापक परिचय व्हावा, यासाठी श्री किशन सोमानी विद्यालयात एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत दयानंद कला महाविद्यालयाचे प्रा. डॉ. संदीपान जगदाळे आणि प्रा. दिनेश जोशी यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले.

कार्यशाळेत डॉ. संदीपान जगदाळे यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा शालेय आराखडा, आयसीटीचा वापर, आणि शिक्षणातील नवाचार यावर सखोल माहिती दिली. ते म्हणाले, “पूर्वीचे ‘घोका व ओका’ शिक्षण आता मागे पडत असून, नव्या धोरणानुसार विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत क्षमतेचा विकास हे केंद्रबिंदू ठरणार आहे. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या बाबींना इयत्ता तिसरीपर्यंत सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार आहे.”

तसेच त्यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार विषय निवडण्यास लवचिकता दिली जाईल. आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, थ्रीडी प्रिंटिंग यांसारख्या कौशल्याधारित अभ्यासक्रमांची आखणी होणार आहे. त्याचबरोबर भारतीय प्राचीन ज्ञानपरंपरेचा आदर राखत नाविन्यपूर्ण शिक्षणाचा विचार या धोरणात आहे.”
प्रा. दिनेश जोशी यांनी “विद्यार्थ्यांच्या क्षमताविकासावर” भर देत सांगितले की, “शालेय शिक्षण केवळ पुस्तकी न राहता, विद्यार्थ्यांच्या मानसिक, सामाजिक आणि भावनिक प्रगतीकडे लक्ष दिले जाणार आहे. कलेचे शिक्षण, खेळ, योगा, तसेच व्यावसायिक शिक्षण यांना धोरणात महत्त्व दिले गेले आहे.”
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मुख्याध्यापक रमाकांत स्वामी यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, “हे धोरण शिक्षण क्षेत्रातील ऐतिहासिक पाऊल असून, शिक्षकांनी याचा अभ्यास करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वृद्धीत त्याचा उपयोग करावा.”
कार्यशाळेचा समारोप संस्थेचे सचिव कमलकिशोर अग्रवाल यांनी केला. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना म्हटले, “हे धोरण २१व्या शतकातील विद्यार्थ्यांना जागतिक नागरिक म्हणून घडवण्याची दिशा देणारे आहे.”
विद्यालयात प्रशिक्षणाचे आयोजन केल्याबद्दल संस्था अध्यक्ष डॅा. चेतन सारडा , कोषाध्यक्ष जयेश बजाज व शालेय समितीचे अध्यक्ष पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी कौतुक केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षिका सुनिता जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक गिरीश कुलकर्णी यांनी केले. या वेळी विद्यालयातील सर्व शिक्षक आणि पर्यवेक्षक उपस्थित होते.

