
लातूर
दि. 24 एप्रिल 2025
लातूर जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती साजरी करण्यासाठी विविध गावांमध्ये उत्साहात तयारी सुरू असतानाच, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील आरी गावात आणि निलंगा विधानसभा मतदारसंघातील हलगरा गावात प्रशासनाच्या वादग्रस्त निर्णयांमुळे सामाजिक तणाव निर्माण झाला आहे.
आरी गावात ग्रामस्थांनी बाबासाहेबांची प्रतिमा लावून जयंती साजरी करण्याची तयारी सुरू केली होती. मात्र, अचानक गावातून बाबासाहेबांची प्रतिमा काढून टाकण्यात आली, ही घटना केवळ ग्रामस्थांच्या भावनांचा अपमान नाही, तर भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकाराचा अवमान करणारी आहे.
दुसरीकडे, हलगरा गावात केवळ चार घरं महार समाजाची आणि चार घरं मांग समाजाची असूनही, या छोट्याशा समाजाने बाबासाहेबांच्या जयंतीसाठी परवानगी मागितली होती. परंतु लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून ही परवानगी नाकारण्यात आली, ही कृती अत्यंत खेदजनक आणि निषेधार्ह आहे.
एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सर्वत्र मोठ्या प्रमाणात बाबासाहेबांची जयंती साजरी करण्याचे आवाहन करत असताना, दुसरीकडे प्रशासन अशा प्रकारे परवानग्या नाकारून सामाजिक विषमता वाढविण्याचे काम करत आहे. ही दुटप्पी भूमिका समाजमनावर खोल आघात करते.
आम्ही, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी, या घटनांचा तीव्र निषेध करतो आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करतो.

