
‘
लातूर, दि. २६ एप्रिल – महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या वैद्यकीय महाविद्यालयीन तरुण-तरुणींनी ‘स्पंदन २०२५’ नृत्यकला महोत्सवात आपल्या अद्वितीय कलागुणांचे प्रभावी सादरीकरण करून लातूरकरांची मने जिंकली. महोत्सवात सादर झालेल्या विविध नृत्य प्रकारांना उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करीत भरभरून दाद दिली.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक आणि माईर एमआयटी पुणे संचलित महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने या दोन दिवसीय राज्यस्तरीय नृत्यकला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

पहिल्या दिवशी नृत्यकला महोत्सवाची सुरुवात पारंपरिक गणेश वंदना आणि ‘ओमकार स्वरूपा’ या गीतावर आधारित नृत्य सादरीकरणाने झाली. त्यानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या वैद्यकीय, आयुर्वेद, दंत, होमिओपॅथी, फिजिओथेरपी व नर्सिंग महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी पारंपारिक नृत्य प्रकारातील शास्त्रीय नृत्य, लोक नृत्य, आदिवासी नृत्य आदी विविध नृत्यप्रकार प्रभावीपणे सादर केले.

तरुणाईने सादर केलेल्या समूहनृत्य, एकपात्री सादरीकरण, लोकनृत्य व आदिवासी नृत्य अशा विविध प्रकारांनी रंगत आणली. त्यांच्या जोशपूर्ण आणि कलात्मक सादरीकरणामुळे संपूर्ण सभागृहात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रत्येक नृत्य सादरीकरणात जोशपूर्ण व सांघिक क्षमतेचे दर्शन घडले.

‘स्पंदन २०२५’ नृत्य कला महोत्सवाने वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या कलात्मकतेला व्यासपीठ मिळवून दिले असून, त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देत सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना दिली आहे.

या वेळी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ, कार्यकारी संचालक डॉ. हनुमंत कराड, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, समन्वयक डॉ. सुनील फुगारे, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. देवेंद्र पाटील, लातूर उपकेंद्राचे समन्वयक डॉ. संतोष डोपे, अधिष्ठाता डॉ. एन.पी. जमादार, प्राचार्य डॉ. सुभाष खत्री, उपाधिष्ठाता डॉ. बी. एस. नागोबा, डॉ. सरिता मंत्री, डॉ. एकनाथ माले, प्राचार्य डॉ. सुरेश कांगणे, प्राचार्य सर्वनन सेना, डॉ. शितल घुले आदी सह एमआयटी शिक्षण संकुलातील प्राध्यापक, डॉक्टर, विद्यार्थी, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

