डोंबिवली / प्रतिनिधी
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण अतिरेकी हल्ल्यात महाराष्ट्राच्या डोंबिवली शहरातील अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हदरला होता. आज त्या हल्ल्याचा सूड भारतीय लष्कराने “ऑपरेशन सिंदूर” द्वारे घेतल्याची बातमी समजताच, या वीरांचा परिवार आणि डोंबिवलीकरांच्या भावना उफाळून आल्या.
“काल रात्रभर झोपच येत नव्हती. मित्राचा फोन आला. टीव्ही लावला आणि पाहिलं – भारत सरकारने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून ९ अतिरेकी तळांवर हवाई हल्ला केला. हे पाहून वाटले की बाबांना शेवटी शांती मिळाली असावी,” अशी भावना स्वर्गीय संजय लेले यांचे सुपुत्र हर्षल लेले यांनी व्यक्त केली. पुढे ते म्हणाले, “ज्या २८ निष्पाप लोकांना त्या हल्ल्यात प्राण गमवावे लागले, त्यात माझे दोघे काका ही होते. आज त्यांच्या बलिदानाचा बदला मिळाल्याचे समाधान आहे.”
याच हल्ल्यात पती गमावलेली अनुष्का मोने म्हणाल्या, “हल्ल्यानंतर आमचं सगळं आयुष्य बदललं. पण सरकारवर विश्वास होता. ‘ऑपरेशन सिंदूर’ केल्यामुळे आमच्या बलिदानाला मान्यता मिळाली आहे. हे केवळ सुरुवात आहे. पाकिस्तानला आता कडक धडा शिकवायलाच हवा.”
भाग्यशाली मैदानावर जमलेले डोंबिवलीकर म्हणतात, “आम्हाला अभिमान वाटतो की भारत सरकारने आणि लष्कराने या देशद्रोही शक्तींना चोख प्रत्युत्तर दिलं. आमच्या वीरांचा बळी व्यर्थ गेला नाही.”
शेकडो नागरिकांनी कंदील आणि फुलं वाहून, “भारत माता की जय” आणि “जय हिंद” चा जयघोष करून वीरांना श्रद्धांजली वाहिली.
‘ऑपरेशन सिंदूर’ : फक्त हल्ला नाही, तर न्यायाचा ठोस दंड
हा हवाई हल्ला म्हणजे केवळ सूड नव्हे, तर न्यायाची पुनर्स्थापना आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं, त्यांच्यासाठी ही केवळ सशस्त्र कारवाई नाही – ही एक भावनिक मुक्तता आहे. शेकडो कुटुंबांमध्ये साचलेला आक्रोश, दुःख आणि वेदना यावरचं हे उत्तर आहे. भारताने आज दाखवून दिलं की, आपण शांतिप्रिय आहोत, पण दुर्बल नाही.
आज हर्षल, अनुष्का आणि असंख्य कुटुंबांच्या डोळ्यांतून अश्रू आले, पण ते दु:खाचे नव्हे – समाधानाचे होते. भारताच्या शत्रूंना आता स्पष्ट संदेश मिळाला आहे – भारत विसरतो, पण क्षमा करत नाही!
हे केवळ युद्ध नव्हे, ही श्रद्धांजली आहे…
“ऑपरेशन सिंदूर” हा त्या प्रत्येक जवान, नागरिक आणि वीरांचा सन्मान आहे, ज्यांनी देशासाठी प्राण दिले. भारत आता नव्या संकल्पाने उभा राहतो आहे – न्यायासाठी, सुरक्षिततेसाठी आणि शांतीसाठी.

