
लातूर, दि. ९ मे — लातूर जिल्ह्यातील काशिलिंगेश्वर नगर ग्रामपंचायतीची निवडणूक तात्काळ जाहीर करण्याची मागणी करत स्थानिक ग्रामस्थांनी मा. जिल्हाधिकारी, मा. उपविभागीय अधिकारी व मा. तहसीलदार यांना निवेदन सादर केले आहे.
२७ एप्रिल रोजी संपूर्ण जिल्ह्यात ग्रामपंचायत सरपंच पदासाठी आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली होती. मात्र काशिलिंगेश्वर नगर ग्रामपंचायतीचा या यादीत समावेश न झाल्याने गावकऱ्यांत संताप निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीची स्थापना होऊन तीन वर्षे उलटून गेली असतानाही आजतागायत निवडणूक न घेणे ही लोकशाही प्रक्रियेची थट्टा असल्याची तीव्र भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

गावात लोकसभा व विधानसभा निवडणुका नियमित पार पडत असताना, केवळ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रशासनाची उदासीनता आणि असमर्थता समजण्यासारखी नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. १११व्या क्रमांकाची ग्रामपंचायत असतानाही फक्त ११० ग्रामपंचायतींसाठीच आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली, ही बाब संशयास्पद असून काही स्थानिक अधिकारी राजकीय दबावाखाली काम करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या निवेदनावर ॲड. किरण बडे, ॲड. प्रभाकर केदार, महादेव जमादार, ॲड. सतीश धायगुडे, श्रीमंत भताने, रघुनाथ गिरी, उदय भैय्या गोजमगुंडे, अभिजीत मद्दे आदींच्या सह्या असून त्यावेळी ते प्रत्यक्ष उपस्थित होते. सदर निवेदनाची प्रत राज्याचे मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य निवडणूक आयोग (मुंबई) यांनाही पाठवण्यात आली आहे.
ग्रामस्थांनी प्रशासनाने तत्काळ निवडणूक प्रक्रिया सुरू करून गावातील लोकशाही हक्काची पुनर्स्थापना करावी, अशी मागणी केली आहे.

