
लातूर – लातूरच्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. मध्यवर्ती बस स्थानकातून औसा, सोलापूर, तुळजापूर, कोल्हापूर, बार्शी, पुणे, मुंबई, धाराशिव आणि कळंब या महत्वाच्या मार्गांवरील एसटी बस सेवा पूर्ववत सुरू करण्यासंदर्भात प्रशासन सकारात्मक भूमिकेत आहे.
नागरी हक्क संघर्ष समिती आणि एसटी प्रवासी संघटना लातूर यांनी याआधी विभाग नियंत्रक, पोलीस अधीक्षक व प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदने सादर केली होती. परंतु प्रशासनाने निर्णयात बदल केला नव्हता. त्यामुळे अखेर संघर्ष समिती व प्रवासी संघटनेने जिल्हाधिकारी वर्षा घुगे यांची भेट घेतली आणि मध्यवर्ती बस स्थानकावरून बस सेवा पूर्ववत सुरू करण्याची आग्रही मागणी केली.
या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हाधिकारी वर्षा घुगे यांनी “सर्वसामान्य प्रवाशांच्या हिताचा निर्णय घेईन,” असे स्पष्ट आश्वासन दिले.

दरम्यान, खासदार शिवाजी काळगे यांनीही याप्रकरणी तात्काळ लक्ष घालत विभाग नियंत्रक व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून बससेवा सुरू करण्यासंदर्भात सूचनाही दिल्या.
या शिष्टमंडळात भाई उदय गवारे, सूर्यप्रकाश धूत, बसवंत भरडे, कॉ. विश्वंभर भोसले, रामकुमार रायवाडीकर, रघुनाथ बनसोडे, लाला सुरवसे, नवनाथ आल्टे, नागनाथ साळुंखे, प्रा. आनंत लांडगे, अँड. जैनु शेख आदींचा समावेश होता. तसेच, खासदारांना भेटताना अशोक गोविंदपुरकर, रवी गायकवाड, विनय जाकते, अजय सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

या मागणीला पाठिंबा देणाऱ्यांमध्ये पांडुरंग देडे, डॉ. बालाजी रणक्षेत्रे, अँड. लक्षण शिंदे, जी. ए. गायकवाड, रईस टाके, सतीश कारंडे, शेख अब्दुल्ला, सुरज पाटील यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
लातूरकरांसाठी ही एक मोठी सकारात्मक घडामोड असून, मध्यवर्ती बस स्थानकावरून बस सेवा पूर्ववत सुरू झाल्यास हजारो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

