
लातूर जिल्ह्यातील आरोग्य सेवा बळकट व्हावी, नागरिकांना दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होती. ही मागणी केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी लातूरच्या जनतेने अनेकदा संघर्ष केला. या संघर्षात “माझं लातूर” परिवाराने देखील महत्त्वाची भूमिका बजावली.

मागणीचा इतिहास
सन २०१३ मध्ये १०० खाटांच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाला मान्यता मिळाली होती. निधी मंजूर झाला होता, मात्र जागेच्या उपलब्धतेच्या अडचणीमुळे प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊ शकली नव्हती. कृषी विद्यापीठाची जागा आरोग्य विभागाला हस्तांतरित करण्यासाठी लागणारा निधी न मिळाल्याने ही प्रक्रिया वर्षानुवर्षे अडकून पडली होती.

“माझं लातूर” परिवाराचा पुढाकार
या अडथळ्यांविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांमध्ये “माझं लातूर” परिवाराचा वाटा मोठा आहे. या परिवाराने शहरात दोन वर्षापूर्वी 2ऑक्टोबर रोजी गांधी चौक येथे साखळी उपोषण करून सर्व राजकीय पक्ष सामाजिक संघटना यांचा पाठिंबा मिळवला जनतेत जनजागृती अभियान राबवले, नागरिकांमध्ये आरोग्य सुविधांच्या गरजेबाबत जागरूकता निर्माण केली. विविध सामाजिक संघटनांशी समन्वय साधत आंदोलनाचे नेतृत्व केले. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी पालकमंत्री,आरोग्यमंत्री,कृषीमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांची वेळोवेळी भेट घेतली.. या नेत्याचे मुखवटे घालून दिल्या शब्दाची जाणिव करून देणारे आंदोलन केले. प्रसंगी भिकमांगो आंदोलन केले.जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणे, माध्यमांतून आवाज उठवणे, तसेच लातूरच्या आमदारांशी संवाद साधून प्रकल्पाच्या गतीसाठी प्रयत्न करणं—या सर्व टप्प्यांत “माझं लातूर” परिवार सक्रीय राहिला.



पालकमंत्र्यांचा सक्रिय पाठपुरावा
शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिलं. त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वित्त मंत्री यांच्याकडे निधीच्या मंजुरीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. मार्च २०२५ मध्ये अर्थसंकल्पात जागेच्या मोबदल्याचा निधी मंजूर झाला आणि अखेर १४ मे २०२५ रोजी कृषी विभागाने शासन निर्णय काढून निधी कृषी विद्यापीठाकडे वर्ग केला.


या निधी वर्गामुळे रुग्णालयासाठी लागणारी १० एकर जागा आरोग्य विभागाला अधिकृतपणे हस्तांतरित होणार आहे. लवकरच जिल्हा रुग्णालयाच्या प्रत्यक्ष उभारणीला सुरुवात होईल. हे रुग्णालय लातूरच्या आरोग्यसेवेसाठी मैलाचा दगड ठरेल.

लातूर जिल्हा रुग्णालय : “माझं लातूर” परिवाराच्या लढ्याला अखेर यश
लातूर जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक टप्पा गाठणारा निर्णय नुकताच शासनाच्या वतीने घेण्यात आला. जिल्हा रुग्णालयाच्या जागेच्या मोबदल्यासाठी ३ कोटी ३२ लाख ६८ हजार ६५० रुपयांचा निधी कृषी विभागामार्फत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठास वर्ग करण्यात आला आहे. या निर्णायक पावलामागे केवळ शासकीय प्रक्रिया नाही, तर गेली दोन वर्षे सातत्याने संघर्ष करणाऱ्या “माझं लातूर” परिवाराचा एक प्रभावी आणि दृढ लढा आहे.



पार्श्वभूमी : लातूर जिल्हा रुग्णालयाची गरज
१ ऑक्टोबर २००८ रोजी जिल्हा रुग्णालयाची इमारत आणि मनुष्यबळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास वर्ग करण्यात आले. त्यानंतर २०१२ मध्ये राज्य सरकारने जिल्हा सामान्य रुग्णालयास मान्यता देत १२० कोटींच्या बांधकामासाठी तरतूद केली. १९ जुलै २०१९ रोजी कृषी विद्यापीठाच्या सर्वे नं. ३७ मधील १० एकर जमीन जिल्हा रुग्णालयासाठी आरक्षित करण्यात आली, पण प्रत्यक्ष ताबा मिळाला नाही. त्याच्या मोबदल्यात २ कोटी ८२ लाख रुपये द्यावेत असे ठरले होते, ज्याचे मूल्य आता ३ कोटी ३२ लाखांवर पोहोचले होते.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयावर सध्या क्षमतेपेक्षा पाचपट अधिक रुग्णांचा भार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयाची गरज अधिक तीव्रतेने जाणवत होती.

“माझं लातूर” परिवाराचा संघर्ष
या महत्वाच्या मागणीसाठी “माझं लातूर” परिवाराने २ ऑक्टोबर २०२३ रोजी गांधी जयंतीच्या दिवशी महात्मा गांधी चौकात बेमुदत साखळी उपोषण सुरू केलं. या आंदोलनाला लातूरमधील सर्व राजकीय पक्षांचे नेते, ५६ सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि अनेक मान्यवरांनी जाहीर पाठिंबा दिला.
उपोषणाच्या सहाव्या दिवशी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे आणि तहसीलदार सौदागर तांदळे यांच्या उपस्थितीत उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले. शासनाचे प्रतिनिधी म्हणून आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी लेखी आश्वासन देऊन एक महिन्याच्या आत निर्णय घेतला जाईल असे नमूद केले.
“माझं लातूर” परिवाराच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन, क्रीडामंत्री संजय बनसोडे, उद्योगमंत्री उदय सामंत आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना भेटून जिल्हा रुग्णालयासाठी विशेष विनंती केली.

अनेक वेळा करण्यात आलेल्या निवेदन भेटी:
- २९ जानेवारी २०२४ – कोल्हापूर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन
- ६ ऑगस्ट २०२४ – पालकमंत्री गिरीश महाजन यांना सादर
- २१ ऑगस्ट २०२४ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची विमानतळावर भेट
- ३ सप्टेंबर आणि १४ सप्टेंबर – मुख्यमंत्र्यांना पुन्हा निवेदन
- २८-२९ सप्टेंबर – सर्व नेत्यांचे मुखवटे घालून भीक मागून आंदोलन
- १८ डिसेंबर २०२४ – नागपूर अधिवेशनात निवेदन
- ३० जानेवारी २०२५ – पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची निधी तरतूदीची माहिती
- १० मार्च २०२५ – अर्थसंकल्पात निधी मंजूर
अखेरीस मिळालेले यश
गेल्या दोन वर्षांपासून ‘माझं लातूर’ परिवाराच्या वतीने सुरू असलेल्या शांततामय, लोकशाही मार्गाने लढलेल्या संघर्षाला अखेर यश लाभले. निधी वर्ग झाला असून आता १० एकर जमीन आरोग्य विभागाकडे अधिकृतपणे हस्तांतरित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या पुढे लातूर जिल्हा सामान्य रुग्णालयाची उभारणी होऊन हजारो रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
ही केवळ निधी वर्गाची बातमी नाही, तर ही जनआंदोलनाच्या आणि नागरिकांच्या दृढ इच्छाशक्तीची जिंकलेली लढाई आहे. “माझं लातूर” परिवाराने सामाजिक उत्तरदायित्वाचे उदाहरण घालून दिले आहे. यामध्ये सहभागी सर्व सदस्य, पदाधिकारी, नागरिक, पत्रकार, आणि शासन दरबारी मदत करणारे सर्व अधिकाऱ्यांचे आणि नेत्यांचे विशेष आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.
हा लढा आता प्रेरणा बनून उभा राहिला आहे – सामाजिक परिवर्तनासाठी, न्याय्य मागण्यांसाठी आणि लोकशाहीच्या प्रभावी वापरासाठी.या यशस्वी प्रक्रियेचे श्रेय एकीकडे शासनाच्या प्रयत्नांना असले, तरी लातूरकर जनतेचा, विशेषतः “माझं लातूर” परिवाराचा सातत्यपूर्ण संघर्ष आणि सामाजिक जबाबदारी यामुळेच हा लढा यशस्वी झाला. हा विजय लोकशक्तीचा आहे—आरोग्याच्या हक्कासाठी संघटित झालेल्या समाजाचा आणि त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या नेतृत्वाचा.
– दीपरत्न निलंगेकर
संपादक,

