
लातूर : पोद्दार ऍक्सिडेंट अँड ट्रॉमा केअर सेंटर, लातूर व सार्वजनिक आरोग्य विभाग, लातूर शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री टीबी मुक्त अभियान अंतर्गत टीबी रुग्णांना मंगळवारी, दि. ३ जून २०२५ रोजी न्यूट्रिशनल सपोर्ट किटचे वाटप करण्यात आले.
लातूर जिल्हा क्षयरोग मुक्त करण्याच्या दृष्टीने शासनामार्फत नियमित मोफत औषधींचा पुरवठा करण्यात येतो. परंतु औषधासोबतच रुग्णाच्या पूर्णतः ठीक होण्याकरिता आवश्यक असणाऱ्या पोषण आहाराच्या पूर्ततेसाठी लोकसहभागामधून न्यूट्रिशनल सपोर्ट किट देऊन निक्षय मित्र होता येते. निक्षय मित्र होण्याची प्रेरणा घेऊन लातूर शहरामधील पोद्दार ऍक्सिडेंट अँड ट्रॉमा केअर सेंटरचे संचालक डॉ. अशोक पोद्दार यांनी ५० रुग्णांकरिता न्यूट्रिशनल किट देऊन या मोहिमेमध्ये सहभाग नोंदवला. यावेळी टीबी रुग्णांना डॉ. पोद्दार यांच्या मातोश्री मणीबाई पोद्दार यांच्या आणि मान्यवरांच्या हस्ते न्यूट्रिशनल किटचे वाटप करण्यात आले. पोद्दार हॉस्पिटल मार्फत देण्यात आलेले किट हे दातृत्व भावाचे उत्तम उदाहरण असून, समाजातील इतर दात्यांनी देखील याचप्रमाणे या अभियानात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त देविदास जाधव यांनी यावेळी बोलताना केले. हे देण्यात आलेले न्यूट्रिशनल किट लातूर शहरातील टीबी ग्रस्त रुग्णांना देण्यात येणार असून यामुळे त्यांना चांगली मदत होणार आहे, असे मत जिल्हा क्षयरोग अधिकारी, लातूर डॉ. एस. तांबारे यांनी व्यक्त केले.
पोद्दार हॉस्पिटलचे संचालक, लातूरचे ख्यातनाम अस्थिशल्य चिकित्सक डॉ.अशोक पोद्दार हे कायम मोफत आरोग्य शिबिरे, पाणपोई, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात रुग्णांच्या नातेवाईकांना भोजन, थंडीच्या दिवसात गरजूंना ब्लॅंकेटचे वाटप, कोरोना काळात अन्नधान्य किट्सचे वाटप, दिशा सामाजिक संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्याकामी अग्रेसर असतात. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा असे समजून चालणाऱ्या डॉ. पोद्दार यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना या अभियानाच्या माध्यमातून मनपाने टीबी रुग्णांच्या सेवेची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आपणास मनस्वी आनंद झाल्याचे सांगितले. टीबीच्या निर्मूलनार्थ समाजातील विविध घटकांनी एकत्रित येऊन सहकार्य करण्याची तयारी ठेवणे आजघडीला अत्यावश्यक झाले आहे,असे मतही डॉ. पोद्दार यांनी व्यक्त केले.
यावेळी लातूर शहर महानगरपालिकेचे उपायुक्त (आरोग्य) डॉ. पंजाबराव खानसोळे , वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. शंकर भारती, डॉ. हर्षवर्धन राऊत, डॉ. स्वाती मजगे, सौ. भावना अशोक पोद्दार, डॉ. पल्लवी जाधव यांच्यासह आशा स्वयंसेविका आणि क्षयरोग विभागाचे कर्मचारी – पोद्दार हॉस्पिटलचा सर्व स्टाफ – कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ऋषिकेश खरोळकर यांनी केले.
————————————————-

