
लातूर, ५ जून —
पर्यावरण रक्षणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत सह्याद्री देवराई, स्टीम एज्युकेशन औसा रोड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चला सावली पेरुया’ या नावीन्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात आज पर्यावरण दिनानिमित्त करण्यात आली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन अतिरिक्त जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, सह्याद्री देवराईचे समन्वयक सुपर्ण जगताप, सामाजिक कार्यकर्ते ओमप्रकाश झुरुळे यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमात सुपर्ण जगताप यांनी लहान मुलांना बी रुजवण्याची संकल्पना अतिशय प्रभावीपणे समजावली. पालापाचोळा, शेणखत, गांडूळ खत यांचा वापर करून बी रुजवायच्या पिशवीत बी कसे टाकायचे, त्यांचे संगोपन कसे करायचे, झाड मोठे होईपर्यंत त्याची काळजी कशी घ्यायची हे त्यांनी प्रात्यक्षिकासह समजावून सांगितले. त्यांनी मुलांना आवाहन केले की, “या उपक्रमात आई-वडिलांना मदतीसाठी सहभागी करून घ्या, संपूर्ण कुटुंबाने निसर्ग संवर्धनाची जबाबदारी घेतली पाहिजे.”

कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांनी “या ब्रह्मांडाचे फुलपाखरू मधमाशांचे ऋण” व्यक्त करणारी पर्यावरणविषयक प्रार्थना घेतली, ज्यामुळे संपूर्ण वातावरण निसर्गमय झाले.
एक विशेष बाब म्हणजे, लातूर वृक्ष चळवळीच्या माध्यमातून २०१५-१६ मध्ये लावलेली १५,००० झाडे यावर्षी आठवणीने परत उजळवली गेली. त्यातील पिंपळ, शिरीष, बकुळ यांचा प्रतिकात्मक वाढदिवस साजरा करत पर्यावरण दिनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. कल्पना झुरुळे यांनी आभार प्रदर्शनासह केले.
या वेळी पत्रकार अभय मिरजकर, लातूर वृक्ष चळवळीच्या पूजा बोमणे, स्टीम एज्युकेशनचे अमोल चव्हाण, राम स्वामी, शाळेतील सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🌿 पर्यावरण दिनाचे महत्व:
प्रत्येक वर्षी ५ जून रोजी साजरा होणारा जागतिक पर्यावरण दिन हा संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या (UNEP) पुढाकाराने साजरा केला जातो. या दिनाचे उद्दिष्ट म्हणजे जनजागृती निर्माण करून प्रत्येक नागरिकाला पर्यावरण संवर्धनाची जाणीव करून देणे.
सह्याद्री देवराईचा ‘चला सावली पेरुया’ हा उपक्रम केवळ एक कार्यक्रम न राहता, निसर्गप्रेमाची बीजे पेरण्याचे आंदोलन ठरणार आहे.
झाडे लावणे, त्यांचे संगोपन करणे, ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून ही पिढ्यान् पिढ्यांची गुंतवणूक आहे, असे या कार्यक्रमातून स्पष्ट झाले.

