
– ३ लाख ८० हजार ७२० रुपयांचे धनादेश वितरित
लातूर :
“ज्ञानाचा दिवा कधीही विझू नये, आणि आर्थिक अडचणींनी कोणाचेही स्वप्न अडखळू नये” — या विश्वासाने लातूरच्या दिशा प्रतिष्ठानने पुन्हा एकदा एक अनोखी सामाजिक पेरणी केली. आर्थिक अडचणींमुळे शिक्षण धोक्यात आलेल्या २२ विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने ३ लाख ८० हजार ७२० रुपयांचे धनादेश देऊन उज्ज्वल भविष्यासाठी नवी दिशा दिली.
लातूर येथील क्रीडा संकुलासमोर झालेल्या या भावस्पर्शी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अशोक पोद्दार होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये डॉ. अभय कदम, डॉ. सुनीता पाटील, डॉ. स्मिता वडे, डॉ. श्रीशैल्य जळकोटे, गणेश देशमुख, सुनील कांबळे, बंडू किसवे, अमोल धाडगे, श्रीकांत ठोंबरे, जीशान पटेल, निधी कदम, इरा कदम यांची उपस्थिती लाभली.
प्रास्ताविक करताना दिशा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोनू डगवाले यांनी संस्थेच्या मागील पाच वर्षांच्या कार्याचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, “एकही विद्यार्थी शैक्षणिक शुल्काअभावी शिक्षणापासून वंचित राहू नये” या ब्रीदवाक्याने दिशा प्रतिष्ठान कार्यरत असून, शैक्षणिक मदत आणि फिरत्या दवाखान्याद्वारे अनेकांचे जीवन उजळवले आहे.
कार्यक्रमात कांबळे प्रणव, प्राजक्ता जोशी, जाधव अस्मिता, मुळे अनिकेत, कणसे श्याम, तेलंग सागर, सायली कुलकर्णी, स्नेहा बंग, पंकज रामावत, प्रथमेश संतोष, सोमवंशी संध्याराणी, रामलिंग स्वामी, परमेश्वर भारती, हनुमंत मुळे, श्रीनिवास देशपांडे, स्नेहा गरड, बिराजदार श्वेता, भाग्यश्री ननंदकर, राहुल शिंदे, ओमकार सूर्यवंशी, क्षीरसागर प्रज्ञा, प्रांजल पाटील आदी विद्यार्थ्यांना आर्थिक मदत प्रदान करण्यात आली.
मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना धनादेश देताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधानाची स्मितरेषा उमटली. मान्यवरांचा सत्कार दिशा प्रतिष्ठानतर्फे झाडाची रोपे देऊन करण्यात आला – पर्यावरणपूरक सन्मानाची ही परंपरा उपस्थितांनी कौतुकाने नोंदवली.
अध्यक्षीय समारोपात डॉ. अशोक पोद्दार यांनी दिशा प्रतिष्ठानच्या सामाजिक बांधिलकीचा गौरव करत भविष्यातही अशी कार्ये सातत्याने घडावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली. तर गणेश देशमुख, सुनील कांबळे, डॉ. सुनीता पाटील, अमोल दाडगे आदी मान्यवरांनी मनोगतातून संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इसरार सगरे यांनी केले, तर आभारप्रदर्शन वैशाली यादव यांनी मानले.
दिशा प्रतिष्ठानची ही मदत केवळ आर्थिक आधार नव्हे, तर आशेचा हात असून, लातूरच्या शैक्षणिक आकाशात उमलणाऱ्या नव्या ताऱ्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ ठरते आहे.

