
ग्रामीण विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन व आधुनिक तंत्रज्ञान अनुभवण्याची संधी

लातूर (२६ ऑगस्ट) – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियंता आणि गणित (STEM) या विषयांमध्ये प्रयोगशीलता, सर्जनशीलता व वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी चाकूर तालुक्यातील वडवळ (नागनाथ) येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत अत्याधुनिक मिनी STEM लॅबोरेटरीची स्थापना करण्यात आली आहे.
या लॅबचे उद्घाटन आज माजी प्राचार्य माधव गादेकर यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कलापंढरी संस्थेचे अध्यक्ष बी. पी. सुर्यवंशी होते. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक गोपाळ एनकफळे, प्रा. रामकृष्ण सम्मुखराव, शालेय समिती अध्यक्ष संगमेश्वर कसबे, उपाध्यक्ष सरफराज कुरेशी, मुख्याध्यापिका धनश्री शर्मिला, तसेच मिना देवकते, मायाताई सोरटे, कोमेश कसबे आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्देश आणि पार्श्वभूमी
या लॅबच्या उभारणीसाठी कलापंढरी संस्था आणि चाईल्ड राईट्स अँड यू (CRY), मुंबई या सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पारंपरिक पद्धतींपेक्षा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गणित व विज्ञान प्रयोग करण्याची संधी मिळावी, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

मान्यवरांची भाषणे
- प्रास्ताविकात विशाखा चव्हाण यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेत सांगितले की, या शाळेतून अनेक विद्यार्थी केवळ शैक्षणिकच नव्हे तर क्रीडा क्षेत्रातही उत्कृष्ट कामगिरी बजावत आहेत. अनेकवेळा या शाळेतील विद्यार्थ्यांनी तालुका व केंद्र स्तरावर दहावीत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
- उद्घाटक माधव गादेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात अनुभवआधारित शिक्षणाची गरज आहे. STEM लॅबमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोगांची संधी मिळून भविष्यातून वैज्ञानिक घडतील. शिक्षक व शालेय व्यवस्थापनाने या लॅबचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा.”
- कलापंढरी संस्थेचे अध्यक्ष बी. पी. सुर्यवंशी म्हणाले की, “गावातील विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकापुरते न राहता प्रत्यक्ष प्रयोग करून शिकण्याची संधी मिळाली पाहिजे. STEM लॅबमुळे विद्यार्थी विज्ञान आणि गणितासारखे कठीण वाटणारे विषय आनंदाने व सोप्या पद्धतीने समजून घेतील. यामुळे पालकांचा विश्वास वाढून शाळेची पटसंख्या देखील नक्कीच वाढेल.”
- प्रा. रामकृष्ण सम्मुखराव यांनी विविध शोध, वैज्ञानिकांचे योगदान आणि विज्ञानाच्या प्रत्यक्ष उपयोगांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
विद्यार्थ्यांचा उत्साह
या नवीन लॅबच्या उद्घाटनावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. अनेक विद्यार्थ्यांनी या संधीबद्दल आनंद व्यक्त करत, “आता विज्ञान शिकणे अधिक मनोरंजक व सोपे होईल” अशी भावना व्यक्त केली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राहुल गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन माधव सुर्यवंशी यांनी मानले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना STEM लॅबच्या माध्यमातून आधुनिक शिक्षणाची दारे खुली झाली आहेत. या लॅबमुळे विज्ञान व गणित विषयांबाबतची भीती दूर होऊन विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिकता, प्रयोगशीलता व आत्मविश्वास वाढेल.

