
मराठवाड्याच्या सर्वच क्षेत्रातील कोट्यवधींचा अनुशेष भरून काढण्याच्या दृष्टीने मराठवाड्यातील खासदार आमदारांची एक संयुक्त बैठक खा. डॉ. शिवाजीराव काळगे यांच्या नेतृत्वाखाली लवकरच लातूर येथे आयोजित करण्याचा निर्णय शनिवारी येथे झाला.
मराठवाडा अस्मिता जागर यात्रा आणि मराठवाडा जनता विकास परिषदेच्या संयुक्त वतीने आयोजिण्यात आलेल्या सर्वपक्षीय नागरिकांच्या सभेत हा निर्णय घेण्यात आला. मराठवाडा स्वाभिमान संघटनेच्या वतीने हे त्या 11 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर या कालावधीत ही मराठवाडा अस्मिता जागर यात्रा तुळजापूर पासून निघून छत्रपती संभाजीनगर येथे जाणार आहे. यात्रेचे औचित्य साधून आयोजिण्यात आलेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी खा. डॉ. काळगे होते. प्रारंभी आपल्या स्वागत पर प्रास्ताविकात मराठवाडा जनता विकास परिषदेच्या लातूर महानगर शाखेचे अध्यक्ष जयप्रकाश दगडे यांनी सभेची भूमिका स्पष्ट केली. सभेचे संयोजक मोईजभाई शेख यांनी मराठवाड्यातील अनुशेषाची करोडो रुपयांची आकडेवारी सादर केली. मराठवाड्याच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आता आक्रमक भूमिका घेतली पाहिजे असे ते म्हणाले. मराठवाडा स्वाभिमान संघटनेचे सर्वेसर्वा व यात्रेचे प्रमुख संयोजक नामदेवराव पाटील यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात मराठवाड्यावर
सातत्याने होत असलेल्या अन्यायाबद्दल आवाज उठविला. मराठवाड्याच्या वाट्याला आलेला निधी पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ पळून नेत असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेबद्दलही त्यांनी सखेदाश्चर्य व्यक्त केले.
विविध वक्त्यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करीत सूचना मांडल्या. वंचित बहुजन आघाडीचे विनोद खटके यांनी यात्रेला पाठिंबा दर्शवित ही यात्रा मराठवाड्यातील प्रत्येक आमदार खासदारांच्या घरा पर्यंत नेण्याची सूचना केली. एडवोकेट गोविंद शिरसाट यांनी मराठवाड्यासाठीच्या लढ्याला वैचारिक बैठक असावी असे सुचविले. जोपर्यंत मराठवाड्यातील लोकांचा स्वाभिमान जागा होत नाही तोपर्यंत अनुशेष भरून निघणार नाही असे ते म्हणाले. शेकापनेते ॲड. भाई उदय गवारे यांनी चळवळीशिवाय पर्याय नसल्याचे सांगत वैचारिक मांडणीला जन चळवळीची जोड हवी असे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ॲड. व्यंकट बेद्रे म्हणाले, 11 सप्टेंबर पासून निघणाऱ्या मराठवाडा अस्मिता जागर यात्रेला आपले समर्थन असून आपण तन मन धनाने यात्रेला सहकार्य करू . मराठवाड्यातील अनुशेष भरून निघावयाचा असेल तर राज्य व केंद्र सरकारवर दबाव गट निर्माण केला पाहिजे.
आपल्या अभ्यासपूर्ण आणि सडेतोड भाषणात काँग्रेस नेते अशोक गोविंदपूरकर यांनी दबाव गट तयार करण्यासाठी मराठवाड्यातील आठ खासदारांचे नेतृत्व खासदार डॉक्टर शिवाजीराव गाडगे यांनी करावे ,नव्याने अनुशेषाची मांडणी करावी, आणि प्रत्येक जिल्ह्याचा अनुशेष तपशीलवार मांडावा अशी सूचना केली . तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) चे जिल्हाध्यक्ष संजय शेटे यांनी गोविंदपूरकरांच्या सूचनेला समर्थन जाहीर करीत सर्वजण मिळून हा लढा पुढे नेण्याचे आवाहन केले. प्राचार्या डॉ. शहजादी शेख यांनी मराठवाड्यात प्रक्रिया उद्योग निर्माण केल्याशिवाय शेतकऱ्यांचा विकास अशक्य असल्याचे सांगितले. दिशा प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा अभिजीत देशमुख यांनी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. मराठवाड्याचा अनुशेष कमी कसा होईल हे पाहण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची असल्याचे सांगून खासदार डॉक्टर काळगे यांनी या चळवळीचे यजमानपद घ्यावे आणि कृती समिती निर्माण करावी अशी सूचना केली लोकप्रतिनिधींना कामाला लावणे गरजेचे असून हा लढा दीर्घकालीन असल्याचे स्पष्ट केले.
मराठवाडा जनता विकास परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे यांनी आतापर्यंतच्या सर्व शासनकर्त्यांनी मराठवाड्यावर केलेल्या अन्यायाचा स्पष्ट शब्दात आढावा घेतला . 11 सप्टेंबर पासून निघणाऱ्या जागर यात्रेचे जंगी यास्वागत लातूर जिल्ह्यात झाले पाहिजे असे आग्रहपूर्वक प्रतिपादन त्यांनी केले. जलतज्ज्ञ ॲड. व्ही. डी. जाधव यांनी महाराष्ट्रात उपलब्ध पाणीसाठा 3500 टीएमसी असल्याचे सांगितले. त्यापैकी कृष्णा खोऱ्याचे 64 टीएमसी, गोदावरी खोऱ्याचे 90 टीएमसी कोकण खोऱ्याचे ३०० टीएमसी, तर तापी खोऱ्याचे 100 टीएमसी पाणी अडविण्याचा अधिकार मराठवाड्याला असल्याचे सांगितले. गोदावरी खोऱ्याचा 19% भूभाग लातूर धाराशिव आणि बीड चा असल्याचीही माहिती त्यांनी दिली.
मराठवाड्यातील सर्वच क्षेत्रांमध्ये प्रचंड विशेष वाढला असून त्यावर विचार करण्यासाठी आमदार खासदारांची बैठक बोलाविण्याची सूचना आणि त्याद्वारे दबाव गट वाढविण्याची सूचना माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केली. राज्यात आमच्या पक्षाचे (भाजपा) सरकार सत्तेवर असले, तरी या चळवळी मागे मी खंबीरपणे उभा असून सर्वतोपरी सहकार्य यात्रेसाठी केले जाईल असेही कव्हेकरांनी स्पष्ट केले.
अध्यक्षीय समारोपात खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे म्हणाले, आपण म्हणाल ती जबाबदारी स्वीकारण्यास मी तयार आहे या लढ्यात मी आपल्या सोबत आहे मराठवाड्यातील प्रलंबित रेल्वे प्रश्नांचा मी पाठपुरावा करीतच आहे शेतकऱ्यांचे प्रश्नही मी केंद्रीय मंत्री पर्यंत नेऊन ते ऐरणीवर आणले आहेत आपली साथ असेल तर खासदार आमदारांची बैठक लातूरला जरूर आयोजित करू सर्वांनी सहकार्य करावे या बैठकीद्वारे केंद्र किंवा राज्य सरकारवर दबाव गट निर्माण करायला हवा.
शेवटी शिवाजीराव माने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी आभार मानले.

