
डॉ. बी.आर. पाटील, माजी अध्यक्ष – ज्येष्ठ नागरिक संघ, लातूर व द. मराठवाडा प्रादेशिक विभाग संघटक सचिव, महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ, मुंबई
१ ऑक्टोबर हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून पाळला जातो. या दिवशी जगभरातील ज्येष्ठांच्या व्यथा, वेदना आणि त्यांच्याप्रति असलेली जबाबदारी समाजाला स्मरण करून दिली जाते. परंतु आजची वस्तुस्थिती अशी आहे की, कुटुंब, समाज, प्रशासन आणि शासन यांच्या सर्व स्तरांवर ज्येष्ठांविषयी प्रचंड उदासीनता दिसून येते.
ज्येष्ठ नागरिक हे आपल्या आयुष्याच्या सुवर्णकाळात समाज, राष्ट्र व कुटुंबासाठी कष्टाचे घाम गाळतात. शेवटच्या टप्प्यात त्यांना किमान सन्मानाचे जीवन लाभावे ही अपेक्षा काही फार मोठी नाही. मात्र त्यांना दिले जाणारे लाभ, सुविधा या हक्काच्या असतानाही त्या मेहरबानीसारख्या दिल्या जात आहेत.
ज्येष्ठांचे वास्तव आणि संघर्ष
- वयाचे निकष: शासनाने ज्येष्ठत्वाची वयोमर्यादा ६० वर्षे ठरवली आहे. तरीही अनेक योजना व लाभ हे ६५ वर्षानंतरच मिळतात. हे विसंगत वास्तव आहे.
- प्रवास सवलती थांबल्या: रेल्वे प्रवासातील सवलती कोवीडच्या काळात थांबल्या. आजही त्या पुन्हा सुरू झालेल्या नाहीत. हजारो ज्येष्ठ नागरिकांना त्यामुळे अडचण भासत आहे.
- कागदी समित्या: राज्य शासनाने जिल्हा व तालुका स्तरावर ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी समित्या स्थापन केल्या आहेत. पण या समित्या फक्त कागदोपत्री असून प्रत्यक्ष कार्यवाही शून्य आहे.
- आरोग्य सुविधा: आरोग्यविषयक समित्यांचेही असेच चित्र आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या वाढत्या आजारपणाकडे पाहता अधिक चांगल्या आरोग्य सुविधांची तातडीची गरज आहे.
- विरंगुळा केंद्रांची गरज: ज्येष्ठांचे आयुष्य आनंदी, सक्रिय व समाधानकारक राहावे यासाठी विरंगुळा केंद्रांची उभारणी आवश्यक आहे. आज ती केवळ घोषणांच्या पातळीवर आहे.
सामाजिक व मानसिक व्यथा
- समाजात १२ टक्के लोकसंख्या ज्येष्ठांची आहे. त्यात ५३ टक्के महिला व ४७ टक्के पुरुष आहेत.
- फक्त ९ टक्के ज्येष्ठांना पेन्शनचा लाभ मिळतो. उर्वरित बहुसंख्य लोकांना अनिश्चिततेत जगावे लागते.
- एकाकीपणा, दुर्लक्ष आणि मानसिक नैराश्य ही त्यांच्यासमोरची सर्वात मोठी आव्हाने होत चालली आहेत. कुटुंब व्यवस्थेतील बदलांमुळे अनेक ज्येष्ठ एकटे पडले आहेत.
आर्थिक असुरक्षितता
- महागाई वाढत असताना पेन्शन व सवलती अपुऱ्या आहेत.
- रोजगाराचे आयुष्य संपल्यानंतर स्थिर उत्पन्न नसल्यामुळे दैनंदिन खर्च भागवणे कठीण जाते.
- अनेक ज्येष्ठांना वैद्यकीय खर्चामुळे कर्जबाजारी होण्याची वेळ येते.
समाज व शासनाची जबाबदारी
ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान राखणे ही फक्त नैतिकच नव्हे तर कायदेशीर व सामाजिक जबाबदारी आहे.
- कुटुंब : ज्येष्ठ हे अनुभवाचे भांडार आहेत. त्यांच्या शहाणपणाचा उपयोग करून घेण्याऐवजी त्यांना ओझे मानण्याची प्रवृत्ती वाढते आहे. ती थांबवणे आवश्यक आहे.
- समाज : समाजातील संस्था, संघटना यांनी ज्येष्ठांना सक्रिय ठेवण्यासाठी व्यासपीठे निर्माण करणे गरजेचे आहे.
- प्रशासन व शासन : योजना अंमलात आणणे, निधी वेळेवर उपलब्ध करून देणे, समित्यांना कार्यरत करणे ही प्रशासनाची थेट जबाबदारी आहे.
काय उपाय हवेत?
- रेल्वे, बस प्रवास सवलती तातडीने सुरू करणे.
- जिल्हास्तरीय समित्या प्रत्यक्षात कार्यरत करणे.
- सर्व तालुका/गावांमध्ये विरंगुळा केंद्र उभारणे.
- ज्येष्ठांना मोफत आरोग्य विमा व सुलभ उपचार सुविधा उपलब्ध करून देणे.
- पेन्शन योजनांचा विस्तार करून जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांना त्याचा लाभ देणे.
- ज्येष्ठांच्या समस्यांवर विशेष लोकपाल किंवा ज्येष्ठ आयोग सक्रिय करणे.
हे विसरू नका…
ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे मूलाधार आहेत. आपण त्यांचे ऋण शब्दांनी कधीही फेडू शकत नाही. पण त्यांना सन्मान, सुरक्षितता आणि आनंदाने जगण्याची संधी देणे हे आपले कर्तव्य आहे. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त मी प्रशासन, शासन, समाज आणि कुटुंब यांच्या संयुक्त जबाबदारीची जाणीव करून देतो आणि सर्वांना आवाहन करतो –
“ज्येष्ठांचा सन्मान करा, त्यांचे आयुष्य सुलभ करा, कारण आज ते आहेत, उद्या आपण होऊ.”

