
दि. २ ऑक्टोबर (गांधी जयंती) ते २६ नोव्हेंबर २०२५ या दरम्यान वाराणसी राजघाट ते दिल्ली राजघाट अशी १००० की. मी. ची ५६ दिवसाची ३ राज्यातून, १८ जिल्ह्यातून पदयात्रा सर्व सेवा संघ ( अखिल भारत सर्वोदय मंडळ), सर्व गांधीवादी आणि लोकशाहीवादी संस्था, संघटना, कार्यकर्त्यांच्या सहभागाने आयोजित करण्यात आली आहे. ही पदयात्रा राजघाट, वाराणसी येथून गांधी जयंती दिनी २ ऑक्टोबर २०२५ रोजी वाराणशी राजघाट येथील सर्व सेवा संघाच्या जागेत असलेल्या महात्मा गांधी आणि त्यांचे तीन माकडे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सुरुवात झाली. पोलिस प्रशासनाने १४४ कलम लावून सर्वांना एकत्र जाण्यास मज्जाव केला. गांधीजींना अभिवादन केल्याशिवाय आम्ही जावू शकणार नाही. आम्ही आपल्या नियमांचा भंग करणार नाही म्हटल्यावर पाच पाच कार्यकर्त्यांनी जाऊन अभिवादन केले. अभिवादनानंतर एकत्र सर्वधर्म प्रार्थनाही घेण्यास मज्जाव केला. तेव्हा कार्यकर्त्यांनी गटा गटांनी त्या जागेच्या बाहेरच्या बाजूने रस्त्यावर प्रार्थना केली. सकाळी पायी यात्रेला पाबंदी घातल्याने कार्यकर्ते तशीच गटा गटाणी सरदार वल्लभभाई पटेल आश्रम येथे पोचली व दुपार नंतर पदयात्रा नियमित नियोजनाप्रमाणे मार्गस्थ झाली. ही यात्रा नियोजित मार्गाने २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ७:०० वाजता दिल्लीतील राजघाट येथे जाईल. तिथे “सर्व धर्म प्रार्थना” नंतर “संविधान पदयात्रेच्या रूपाने जंतरमंतर येथे जाईल जिथे कार्यक्रमाचा समारोप जाहीर सभेने होईल.

संपूर्ण पायी पदयात्रेचा मार्ग : राजघाट वाराणसी येथून निघणारी ही पदयात्रा गोपीगंज, प्रयागराज, रायबरेली, लखनौ, उन्नाव, कानपूर, औरैया, इटावा, फिरोजाबाद, आग्रा, मथुरा, फरीदाबाद, निजामुद्दीन या मार्गाने २५ नोव्हेंबर २५ रोजी गांधी स्मारक निधी, नवी दिल्ली येथे पोचेल. दि. २६ नोव्हेंबर (संविधान स्वीकृती दिनी) राजघाट नवी दिल्ली येथे गांधीजींच्या समाधीस्थळी सर्वधर्म प्रार्थना होऊन पदयात्रा सकाळी १० वाजता जंतरमंतरवर पोहोचेल. या 1,000 कि.मी. च्या पदयात्रेत एकूण 110 मुक्कामी थांबायची व्यवस्था पूर्व नियोजनाप्रमाणे करण्यात आली.

संपूर्ण पदयात्रेत पूर्णवेळ सहभागी राहणारे नेतृत्व म्हणजे सर्व सेवा संघाचे अध्यक्ष चंदन पाल, मंत्री अरविंद कुशवाह, अरविंद अंजुम, प्राचार्य डॉ सोमनाथ रोडे, आंदोलन समितीचे निमंत्रक डॉ. विश्वजीत, युवा सेल संयोजक भूपेश भूषण, विनोबा आश्रम गागोदाच्या सरिता बहन, उत्तर प्रदेश सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष राम धीरज भाई, नंदलाल मास्तर, यांचेसह देशातून २३ राज्यातील १५० हून अधिक युवक, युवती, महिला, पुरुष सर्व वयोगटातील कार्यकर्ते सहभागी आहेत. याव्यतिरिक्त चळवळींचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते प्रबुद्ध गांधीवादी, लोकशाही प्रेरित सजग नागरिक, बुद्धिजीवी, जन आंदोलनांचे प्रतिनिधित्व करणारे, लेखक, नाटककार, पत्रकार, राजकीय सामाजिक कार्यकर्ते विविध ठिकाणी या यात्रेत सहभागी होऊन ठीक ठिकाणी यात्रेचे स्वागत, जाहीर कार्यक्रमाचे नियोजनात सक्रीय सहभाग नोंदवत आहेत. या यात्रेत दर चार पाच कि. मी. वर स्थानिक लोक उत्स्फूर्तपणे सर्वांचे स्वागत, चहा, नाश्त्याची सोय करून कृतज्ञता व्यक्त केली जात आहे. दुपारी एक ते दोन या वेळात थांबायचे ठिकाणी सर्वांना भोजन व त्यानंतर विश्रांतीची व्यवस्था असते. दुपारी तीन वाजता परत पदयात्रा सुरू होऊन सायं सहा ते सात या वेळात मुक्कामाच्या थांब्यावर पोचते. या प्रमाणे दररोज दिवसभरात कमीत कमी १८ व जास्तीत जास्त २५ कि. मी. असा पायी चालण्याचा अंतर असतो. या सर्व थांबायचे नियोजन सर्व सेवा संघाच्या पदाधिकारी यांनी पूर्व नियोजन केल्याने ही सर्व यात्रा सुरळीत पणे चालू आहे.
गांधी पीस फाउंडेशनचे अध्यक्ष कुमार प्रशांत, राष्ट्रीय गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष रामचंद्र राही, सेवाग्राम वर्धा आश्रमाच्या अध्यक्षा आशा बोथरा, लोकशाही राष्ट्रनिर्माण मोहिमेचे संयोजक आनंद कुमार, समाजवादी जन परिषदेचे सरचिटणीस अफलातून, राष्ट्रीय जनआंदोलन समन्वयाचे प्रफुल्ल सामंतरा, सर्वोच्च न्यायालयाचे वकील प्रशांत भूषण, भारत जोडो अभियानाचे संयोजक योगेंद्र यादव, नर्मदा बचाओ आंदोलनाच्या मेधा पाटकर, संयुक्त किसान संघर्ष समन्वय समितीचे सुनीलम, समाजवादी पक्षाचे संदीप पांडे आणि जनमुक्ती संघर्ष वाहिनीचे जयंत दिवाण हे यात्रेच्या उद्दिष्टांशी एकता दर्शविण्यासाठी ठीक ठिकाणी वेळोवेळी सहभागी होण्याची संमती दर्शविली आहे.
पदयात्रा कशासाठी पद यात्रेचा उद्देश
१९६० साली वाराणसीच्या राजघाट येथे आचार्य विनोबा भावे यांच्या प्रेरणेतून सर्व सेवा संघाच्या वतीने गांधी आश्रमाची स्थापना केली. १९६०,१९६१ आणि १९७० मध्ये तीन राजिष्ट्रीच्या माध्यमातून १३ एकर जमीन नॉरदर्न रेल्वे कडून खरेदी केली. ज्याची सर्व मूल्यांकन रक्कम चलनाद्वारे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये जमा केली. ज्याचे खरेदी खत सर्वसेवा संघाकडे उपलब्ध आहेत. खरेदी नंतर ज्याची नोंद भूमापन नकाशामध्ये घेण्यात आली आहे. ती जमीन हस्तांतरण प्रक्रिया माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री, डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्यासह तत्कालीन रेल्वे मंत्री बाबू जगजीवनराम यांच्या तांत्रिक सर्व सहमतीने झाली आहे. या जागेत लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या प्रयत्नातून जागतिक कीर्तीचे शोध केंद्र, गांधी विद्या संस्थान सुरू करण्यात आले. इथे तीन मजली इमारतीत सर्व सेवा संघाचा प्रकाशन विभाग होता. सर्व सर्वोदयी, गांधी विचाराचे साहित्य जगभरात येथून वितरित होत होते. यासह १८ छोट्या मोठ्या इमारती या जागेत होत्या. देशात शांती आणि सद्भावनेचे कार्य येथून चालत होते. भूदान आंदोलन, संपूर्ण क्रांती आंदोलन, चंबळाच्या खोऱ्यातील डाकूंचे आत्मसमर्पण यासह गांधी विचाराचे ही हे प्रमुख केंद्र होते.
विद्यमान केंद्र सरकारने कसलीही न्यायिक पूर्व सूचना न देता १२ ऑगस्ट २०२३ रोजी रात्री शेकडो पोलिस आणि बुलडोझर आणून ही सर्व इमारत जमीनदोस्त केले. हे साहित्य अस्ताव्यस्त करून पोलिसांकडून तुडवण्याचा प्रयत्न झाला. त्यावर केंद्र सरकारने अनधिकृतपणे ही जमीन आपल्या कब्जात घेऊन प्रकरण न्यायालयात असून ही बांधकामाचा घाट घातला आहे. याचा शांतपणे संताप व्यक्त करण्याच्या निमित्ताने सर्व सेवा संघ आणि लोकतांत्रिक राष्ट्र निर्माण अभियानाच्या माध्यमातून देशातील एका जिल्ह्याने एक दिवस उपोषण व धरणे करण्याचा निर्णय घेऊन सतत १०० दिवस हे आत्मक्लेश उपोषण व धरणे आंदोलन चालू होते.
या आंदोलनाची व्यापकता वाढवून
सर्व धर्मीय संतांच्या उदारमतवादी परंपरा, स्वातंत्र्य चळवळीच्या आदर्शांचा वारसा, सामाजिक सौहार्द, संविधान आणि लोकशाही याबद्दल जागरूकता निर्माण करणे. शेतकरी, कामगार, तरुण, महिला, दलित, आदिवासी आणि समाजातील सर्व असुरक्षित घटकांचे संवैधानिक हक्क आणि मानवी प्रतिष्ठा सुनिश्चित करण्यासाठी लोकांशी संवाद साधणे आणि भयमुक्त वातावरण निर्माण करणे यासाठी ही यात्रा एका बाजूला न्यायालयीन पातळीवर दुसऱ्या बाजूला जनतेच्या न्यायालयात दाद मागण्याच्या हेतूने ही पदयात्रा सुरू आहे.
त्याच बरोबर आजची देशापुढील जी आव्हाने आहेत त्या बाबतही लोकांच्या मध्ये या आव्हानाची जाणीव करून देण्याच्या दृष्टीने ही यात्रा शोषण आणि शासना पासून मुक्त असलेल्या शांततापूर्ण, अहिंसक जागतिक समाजासाठी वचनबद्ध आहे. हे आदर्श मानवतेसाठी आदर्श आहेत आणि ते साध्य करण्यासाठी बराच वेळ लागेल. याचा अर्थ असा नाही की आजच्या आव्हानांकडे दुर्लक्ष केले पाहिजे. देशात वाढती बेरोजगारी, शेती, गरिबी, शिक्षण आणि आरोग्याचे व्यापारीकरण आणि पर्यावरण या मुद्द्यांवर हस्तक्षेप करणे आणि शेतकरी, कामगार आणि व्यावसायिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करणे ही या यात्रेची एक महत्त्वाची जबाबदारी आहे. आपण मिळवलेले हक्क (मतदानाचा अधिकार) आणि संविधानाने दिलेले हक्क केवळ दृढ पणे राखले पाहिजेत असे नाही तर व्यापक सार्वजनिक हक्क देखील स्थापित केले पाहिजेत. पदयात्रा दरम्यान आपण या मुद्द्यांवर लोकांशी संवाद साधला जात आहे. याला सर्व ठिकाणी अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. इलाहाबाद उच्च न्यायालयाच्या समोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर उच्च न्यायालयाच्या वकील मंडळानी उत्स्फूर्तपणे स्वागत करून जाहीर कार्यक्रमात आश्रमावर झालेल्या कार्यवाहीचा जाहीर निषेध करून पदयात्रेला जाहीर पाठिंबा दिला.
ही पदयात्रा यशस्वी करण्यासाठी संयोजक प्रतिनिधी आणि आयोजकांना, सर्व जागरूक नागरिक आणि लोकशाही संघटनांना थांब्यांची व्यवस्था करण्यात सहकार्य आणि सहभागाचे आवाहन केले आहे. पदयात्रेतील सहभागींचे स्वागत करण्यात आणि शक्य तितक्या जास्त लोकांपर्यंत संदेश पोहोचवण्यात सहभागी होण्याची देखील आयोजकांना अपेक्षा आहे.
या पदयात्रेत महाराष्ट्रातून अनेक गांधी जन यांनी वेगवेगळ्या टप्प्यात सहभागी होण्याचा संकल्प. करून सहभाग नोंदवत आहेत. त्यात प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे, महा. अंनिस चे राज्य अध्यक्ष, माधव बावगे, सत्यशोधक समाजाचे शिवाजी माडे, (लातूर), महा. अंनिस राज्य कार्यवाह डॉ. बालाजी कोम्पलवार, अजय नराड भारत जोडो युवा अकादमी (किनवट) चे जिल्हा नांदेड, महा. अंनिस राज्य कार्यवाह, विवेकवाहिनी प्राचार्या डॉ. सविता शेटे (बीड), डॉ. शिवप्रसाद ठाकूर (वर्धा), लताताई राजपूत, (बुलढाणा),मायताई धांडे , देवीताई वाईकर हे सर्व पहिल्या टप्प्यात सहभागी झाले आहेत. पुढील टप्प्यात डॉ. गणेश गोमारे, शरद झरे, ॲड. सोमेश्वर वाघमारे, गुंडेराव साबळे, प्रा. अर्जुन जाधव, शेषराव चव्हाण ( लातूर), शिवाजी खोगरे, शरद देशपांडे (अंबाजोगाई), रमेश दाणे (धुळे), अविनाश काकडे (वर्धा), शेख हुसेन, बजरंग सोनवणे आदी टप्प्या टप्प्याने सहभागी होताहेत. महाराष्ट्रातील ज्या ज्या संविधान, गांधीवादी संस्था, संघटना, पक्ष, कार्यकर्ते यांनी जास्तीत जास्त संख्येनी वेग वेगळ्या टप्प्यात सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने डॉ. सोमनाथ रोडे यांनी केले आहे. ते या पदयात्रेत पूर्णवेळ सहभागी आहेत.
सध्याची अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना ही या ऐतिहासिक राष्ट्रीय पातळीवरील पदयात्रेत आपल्या भूमिकेवर ठाम राहून केंद्र सरकारला निर्धाराने जाब विचारण्यासाठी आणि सर्व सेवा संघाची जमीन परत करण्याच्या मागणीसाठी ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता सहभागी झालेत याचा सर्व भारतीयांना अभिमानच वाटला पाहिजे. या पदयात्रेला तळागाळातील सामान्य लोकांपासून ते सर्व स्तरातील लोकांचा महिलांचा युवक युवतींचा खूप सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. हे या यात्रेचे सकारात्मक यशच म्हटले पाहिजेत. यावरून गांधी कधी मारत नसतो हे यावरून सिद्ध होते.
२ ऑक्टोबर पासून पदयात्रा सुरू होती. आम्ही ३० तारखेला वाराणसी येथे पोचलो. १ तारखेला वेळ होता उत्सुकता आणि जाणून घ्यावे म्हणून बौद्ध स्तूप पहायला मिळाले. त्यानंतर अयोध्या (काशी, बनारस) पहिली. हे एक मोठे गाव आहे. तेथून राम मंदिर काहीसे दूर आहे. पण ते अयोध्येचाच भाग आहे. रिक्षांचा अर्थपूर्ण व्यवहार जाणवतो. रिक्षातून जाताना रिक्षावाले यांच्याशी चर्चा करताना तो सांगतो हे मंदिराचे गाव आहे येथे कमीत कमी साडेआठशे मंदिर आहेत. राममंदिराला भेट दिल्या नंतर मूळ रामाचे जे मंदिर आहे ज्याचा जगभर गवगवा केला त्या मूळ मंदिराचेच आणखी काम चालू आहे. खूप काम अजून बाकी आहे. परिसर खूप मोठा आहे. जवळपास आजही २००० लोक कुशल कामगार काम करताहेत. मूळ गाभाऱ्यात मूर्ती बसवून समोर उदिष्ट ठेवून उद्घाटन झाले. एकूण असे दिसून आले मंदिर झकास झाले पण गाव आणि त्याचा
विकास याचा विचार करता भकास असंच चित्र दिसतं.पहिल्या टप्यासाठी सहभागी झालेले माधव बावगे, डॉ. सविता शेटे, डॉ. बालाजी कोम्पलवार, श्री शिवाजी माडे हे पहिला टप्पा दि. ९ ऑक्टोबर ला संपताच परतायचे होते. ११ तारखेला ट्रेन होती त्या वेळात मागचा कुंभमेळा झालेले ठिकाण एका बाजूने गंगा आणि दुसऱ्या बाजूने यमुना नद्या येऊन संगम होतो त्यात सरस्वती नदी ही लुप्त आहे असे सांगितले जाते. प्रयागराज (संगम) ही काही स्थळे पहिली. ही देवी, देवता आणि मंदिरांची गावे आहेत. त्यात बारकाईने निरीक्षण केले तर खऱ्या अर्थाने दिसून येते की, इथे देवाच्या नावाने चालवलेले मार्केटिंग फार फॉर्म मध्ये दिसून येते. इथे श्रद्धा ही प्रमाण असते, तिथे विचारला थारा नसतो. मग शिक्षित, सुशिक्षित, अशिक्षित ही सर्व श्रद्धेच्या प्रवाहात सहभागी होतात. शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर म्हणायचे, “अंधश्रद्धा ही श्रद्धेच्या क्षेत्रातील काळाबाजार आहे.” प्रयागराज संगमावर निरीक्षण करताना दिसून आले की, कुंभमेळ्यात इथे पवित्र तीर्थस्नानाठी ६० लाखाहून अधिक लोक येऊन गेले. विद्यमान पंतप्रधान ही येऊन तीर्थस्नान करून गेल्याचे माध्यमांनी खूप गवगवा केला होता. तेव्हा तेथील परिस्थिती पाहता यात खूप अतिशयोक्ती असल्याचे दिसून येते. लोकांना भावनिक गुंतवुकीमध्ये गुंतवून ठेवले की, खूप काही साध्य करता येते. एवढी लोक उपलब्ध जागेत कुठे आणि कशी थांबली? असा प्रश्न पडतो. होडी चालकांच्या संभाषणात हे आढळून येते. पण त्याचा एक प्रामाणिकपण दिसून आला की, सर्व कामे ठेकेदारकरवी केली जातात. ठेकेदार मालामाल होतात. आमचे पोट भरते एवढेच. आता कसलीच गर्दी नसताना तेथील पाणी पाहिले तर, त्याची स्थिती पाहता कोणत्याही विचारी माणसाला त्यात स्नान करावे असे वाटणार नाही. तिथेच बाजूला गंगा नदीच्या पात्रात अनेक प्रेते जळताना पहिले. ती सातत्याने जाळली जातात तोही एक श्रद्धेचा आणि मोक्षाचा मार्ग आहे असे समजले जाते. आमचा श्रद्धेला विरोध नाही. श्रद्धेच्या व्यापाराला आणि त्यामुळे होणाऱ्या शोषणाला विरोध आहे एवढेच.
