पानगाव : येथील तिरुपती विद्यालयात २००८-०९ साली इयत्ता १० उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर व शिक्षक सत्कार सोहळा शनिवारी पार पडला.
यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेले या शाळेचे माजी विद्यार्थी तसेच आजी माजी शिक्षकवृंद उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी यांनी त्यांनी शाळेच्या आठवणींना उजाळा दिला. तब्बल १६ वर्षांनी सर्वजण एकत्रित आल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. आपण कितीही मोठे झालो, वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी झालो तरी शालेय जीवनातील मौज काही वेगळीच असते. आपली शाळा आणि शाळेत जगलेलेलं सोनेरी दिवस कोणीही विसरू शकत नाहीत. मात्र वेळ कोणासाठीही थांबत नाही. तरीही वेळात वेळ काढून तिरुपती विद्यालयाचे सन २००९ चे १० उत्तीर्ण विद्यार्थी व तेंव्हाचे शिक्षक यावेळी पुन्हा त्या शाळेतील आठवणीत जगण्यासाठी व बागडण्यासाठी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे नियोजन परमेश्वर स्वामी व कृष्णा गुडदे यांनी केले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे माजी मुख्याध्यापक जाधव सर होते. प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी शिक्षकवृंद शिंदे, माने, बी के चव्हाण, सोळुंख्ये, सरवदे, एस टी जाधव, गोतावळे सर उपस्थित होते. तसेच यावेळी सध्याचे मुख्याध्यापक गाडे सर, नेताजी चव्हाण, करपे सर, ठाकूर मामा, कांबळे मामा ही उपस्थित होते. या सर्वांचा शाल, श्रीफळ, गुलाब देऊन सत्कार सन्मान करण्यात आला. यावेळी माजी विद्यार्थी यांनी प्रत्येकाने शाळेतील आठवणी यांना उजाळा देत, त्या सर्वांसमोर मांडल्या. येथील शाळेतून मिळालेले शिक्षण व संस्कार हे आजच्या व्यवहारिक जीवनात कसे उपयोगी पडत आहेत हे सर्वांनी सांगितले. सर्वांची ओळख परेड झाली. यानंतर सर्व उपस्थित शिक्षक यांनी आपले मनोगत व्यक्त केले व मार्गदर्शन केले. त्यानंतर मिष्टान्न जेवण सर्वांनी केले. शेवटी संगीत खुर्ची खेळ खेळून सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला.
या २००९ सालच्या बॅच मधील येथील विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहे. आर्मी, पोलिस, वैद्यकीय, वीज, शिक्षण, आय टी, व्यवसाय, शेती, फायनान्स इत्यादी क्षेत्रात कार्य करत आपले व शाळेचे नाव उंचावत आहेत. तर यांनी आपापल्या क्षेत्रात उंच शिखर गाठावे, त्या क्षेत्रातील तज्ञ व्हावे, सोबतच्या मित्र मैत्रिणी यांच्या उपयोगी पडावे, आई वडील यांची सेवा करावी इत्यादी प्रकारे मार्गदर्शन करून गुरुवर्यांनी माजी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावर खूप आनंद होता. आनंद, आपुलकी, उत्साह यांनी भरलेला हा दिवस सर्वांच्या मनावर कायमचा कोरला गेला.

