डॉ. अनिलकुमार बळीराम गायकवाड

राज्यातील रस्ते, अभियांत्रिकी आणि पायाभूत विकासाला नवे आकाश गवसवणारे नाव म्हणजे डॉ. अनिलकुमार गायकवाड. स्वप्न पाहणारा, ते प्रत्यक्षात उतरवणारा आणि प्रत्येक प्रकल्पात महाराष्ट्राचा अभिमान वाढवणारा असा हा माणूस — एक अभियंता नव्हे, तर चालता-बोलता अभियांत्रिकीचा शब्दकोशच आहे.
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील कासारशिरशी या छोट्याशा गावात ३० ऑक्टोबर १९६३ रोजी एका शिक्षकाच्या घरी जन्मलेला हा मुलगा आज महाराष्ट्राच्या अभियांत्रिकी इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदला गेला आहे. साडेतेरा वर्षांच्या वयात मॅट्रिक पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण, सतराव्या वर्षी पॉलिटेक्निक, एकवीसाव्या वर्षी ए.एम.आय.ई. परीक्षा आणि बावीसाव्या वर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वर्ग–एक सेवेतील अधिकारी म्हणून निवड — ही शैक्षणिक वाटचाल म्हणजे प्रेरणेचं शिखर आहे.

लातूरच्या पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये सिव्हिल डिप्लोमा करून त्यांनी अभियांत्रिकीचा पाया घातला. त्यानंतरच्या काळात सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक, आणि समृद्धी महामार्गाचे प्रमुख कल्पक अभियंता म्हणून त्यांची कारकीर्द उजळली.
मुंबईतील क्लिष्ट उड्डाणपूल, मंत्रालयाच्या आगीपश्चात आधुनिक ‘कॉर्पोरेट’ स्वरूपात साकारलेले मंत्रालय भवन, नवी दिल्लीतले आकर्षक महाराष्ट्र सदन, वैतरणा नदीवरील २७६ फूट उंचीचा पूल — हे सर्व त्यांचं दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना आहेत.
महाराष्ट्राच्या “भाग्यरेषा” म्हणून ओळखला जाणारा बाळासाहेब ठाकरे नागपूर–मुंबई समृद्धी महामार्ग हा त्यांच्याच हातून घडलेला अद्वितीय प्रकल्प आहे.

डॉ. गायकवाड हे केवळ अधिकारी नाहीत; ते एक मार्गदर्शक, तत्त्वज्ञ आणि करुणामय माणूस आहेत.
राजकारणी असो वा सामान्य नागरिक — सगळ्यांना आपलेसे करणारी त्यांची वृत्ती हेच त्यांच्या यशाचं रहस्य आहे. वडील बळीराम (दादा) गायकवाड हे त्यांचे प्रेरणास्थान. आई–वडिलांच्या आठवणींना जपण्यासाठी ते दरवर्षी कितीही व्यस्त असले तरी लातूरला येऊन आशीर्वाद घेतात — हे त्यांचं संस्कारांचं प्रतिबिंब आहे.
त्यांचे भाऊ माजी खासदार सुनील गायकवाड आणि उद्योजक विजय गायकवाड तसेच पुत्र अभिजित, अश्वजित आणि विश्वजित यांच्या प्रगतीकडे ते नेहमीच मार्गदर्शनाच्या भूमिकेतून पाहतात. कुटुंबासोबत समाजालाही न्याय देणं हेच त्यांचं जीवनधर्म आहे.
एक काळ असा आला जेव्हा संकटांच्या सावल्या त्यांच्या वाट्याला आल्या. पण सत्य आणि न्यायावर अढळ विश्वास ठेवून त्यांनी त्या प्रत्येक वादळाला समर्थपणे तोंड दिलं. कोर्टाने दिलेल्या न्यायनिर्णयाने त्यांच्या प्रामाणिकतेला शिक्कामोर्तब मिळालं. आणि जेव्हा ते पुन्हा कामावर परतले — तेव्हा कुणाविषयी कटुता नाही, राग नाही — फक्त कार्य आणि करुणा! हीच त्यांची महानता आहे.
अभियांत्रिकीच्या प्रत्येक कामात गुणवत्ता, वेळ आणि परिपूर्णता या तीन तत्त्वांचा ते कटाक्षाने पुरस्कार करतात. ‘संकटे लीलया पेलायची असतात’ हे त्यांचं ब्रीदवाक्य आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली समृद्धी महामार्गापासून ते नवीन शक्तिपीठ महामार्गापर्यंत अनेक प्रकल्प महाराष्ट्राच्या विकासाचा गजर गात आहेत.
त्यांचा स्वभाव संयमी, हृदय भावूक आणि बुद्धी तीक्ष्ण. ते इंग्रजी, मराठी, हिंदी या तिन्ही भाषांवर प्रभुत्व राखतात. एका शिक्षकाच्या घरातून बाहेर पडून इतक्या उंचीवर पोचलेला हा अधिकारी आजही साधेपणाचं मूर्तिमंत उदाहरण आहे.
कितीही मोठी पदं भूषवली तरी त्यांच्या अंगी एक नम्रता, एक सौम्यता आहे — आणि म्हणूनच ते आजही तरुण अधिकारी, अभियंते आणि सामाजिक कार्यकर्त्यांसाठी ‘रोल मॉडेल’ ठरले आहेत.
अशा या अभियंता, अधिकारी, समाजसेवक आणि माणुसकीच्या अधिष्ठानाला त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा —
त्यांची ऊर्जा, प्रेरणा आणि कार्यनिष्ठा महाराष्ट्राला सदैव मार्गदर्शक ठरो हीच प्रार्थना.
#डॉ.अनिलकुमार_गायकवाड_यांना_६२व्या_वाढदिवसाच्या_अभिनंदनाच्या_अभाळभर_शुभेच्छा 🌸
✍️ दीपरत्न निलंगेकर
संपादक – दैनिक युतीचक्र
📞 77220 75999

