
लातूर | ( दिपरत्न निलंगेकर )
मराठवाड्याच्या औद्योगिक आणि रोजगार विकासाचा नवा अध्याय म्हणून ज्या मराठवाडा रेल कोच फॅक्टरीची स्थापना करण्यात आली, तो अध्याय आज “स्थानिकांवर अन्यायाचा ग्रंथ” बनला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेला हा भव्य प्रकल्प — 351 एकर परिसरात उभारलेला — आज “लातूर रेल्वे कोच फॅक्टरी नव्हे, गुजरात-बिहार रेल्वे कोच फॅक्टरी” म्हणून ओळख मिळवतो आहे, असे स्थानिक तरुणांचे संतप्त मत आहे.
🔹 “मेक इन इंडिया” की “टेक फ्रॉम मराठवाडा”?
सरकारचा हेतू स्पष्ट होता — मागास समजल्या जाणाऱ्या मराठवाड्याला औद्योगिक नकाशावर आणणे, स्थानिक युवकांना रोजगार देणे आणि लातूर MIDC मधील लघुउद्योगांना चालना देणे. मात्र वास्तव याच्या पूर्ण उलट दिसत आहे.
किनेट रेल्वे सोल्युशन या रशियन भागीदारीत स्थापन झालेल्या कंपनीने आता रेल्वे कोच उत्पादनाचा ताबा घेतला आहे. JV Agreement नं. 022/RS(WTA-527/वंदे भारत ट्रेन्स/874/02) अंतर्गत मार्च 2025 पासून प्रकल्पाचे कार्य पूर्णपणे या कंपनीकडे आले. सरकार आणि कंपनीचा दावा — 10,000 रोजगार! पण वास्तव — फक्त 150 कामगार कार्यरत, त्यापैकी फक्त 8 ते 10 लातूर-धाराशिव जिल्ह्यातील!
“राज साहेब, न्याय द्या!” — लातूरच्या रेल कोच फॅक्टरीतून स्थानिक तरुणांची हाक!
“भरती गुजरातमध्ये, बेरोजगारी मराठवाड्यात!”
कंपनीने भरतीसाठी गुजरातमध्ये मेळावे घेतले, तर लातूरमधील मेळावा फक्त औपचारिक ठरला. अर्ज घेऊन गेटवरच फेकले गेले, मुलाखती झाल्या पण निकाल नाही.
शिवणखेड गावातील नागनाथ शिंदे हा तरुण आयटीआय वेल्डिंग कोर्स पूर्ण करून दोन वर्षांपासून फॅक्टरीच्या गेटवर चकरा मारतो आहे. “नुकतीच मुलाखत झाली, पण प्रात्यक्षिक घेतलेच नाही. ‘तुमची निवड झालेली नाही’ एवढंच सांगून बाहेर काढलं,” अशी त्याची व्यथित हाक.
“राज साहेब, आम्ही शिकूनसुद्धा हातावर पोट ठेवतो आहोत. या फॅक्टरीत लातूरच्या मुलांना न्याय नाही. तुम्ही आमचं म्हणणं ऐका. आम्हाला फक्त काम हवंय, उपकार नाहीत!” — नागनाथ शिंदे, लातूर
🔹 “रोजगाराचा वादा, परराज्याचा फायदा!”
सध्या कार्यरत असलेले बहुतेक कर्मचारी गुजरात, बिहार, उत्तरप्रदेश येथून आणले गेले आहेत. स्थानिक उमेदवारांकडे पात्रता, डिप्लोमा आणि आयटीआयचे शिक्षण असूनही त्यांना डावलले गेले आहे.
कंपनीने गुजरातमध्ये भरती मेळावा घेतला, पण लातूरमध्ये झालेल्या सप्टेंबर 2025 च्या मेळाव्यात स्थानिकांना फक्त “दाखवण्यासाठी” बोलावले गेले. मुलाखती झाल्या, पण निकाल नाही; प्रतिसाद नाही!
सुरक्षा रक्षकांमार्फत स्थानिक उमेदवारांचे अर्ज घेऊन गेटवरच परत पाठवले गेल्याची तक्रार अनेक युवकांनी केली आहे. गेटसमोरचे अर्ज “बॉक्समध्ये पडून आहेत, पण व्यवस्थापन प्रतिसाद देत नाही,” असा स्थानिक तरुणांचा संतप्त आरोप आहे.
🔹 “कंत्राटी नोकरभरतीचा खेळ”
सध्या कंपनीतील बहुतेक नोकरभरती एक वर्षाच्या करारावर आधारित आहे. म्हणजे कायमस्वरूपी रोजगार नाही. याशिवाय वॉशिंग, सफाई आणि सिक्युरिटी सारखी कामे ही त्रयस्थ (कंत्राटी) कंपन्यांमार्फत दिली जात आहेत. स्थानिक तरुण उच्चशिक्षित असूनही हेच काम “आशेवर” करत आहेत.
मुख्यमंत्रींनी जाहीर केलेले “10,000 रोजगार” हे आकडे आता केवळ राजकीय भाषणापुरते मर्यादित राहिले आहेत.
🔹 “वेंडर्स मीटमध्येही मराठवाडा बाहेर!”
18 जून 2025 रोजी हॉटेल कार्निव्हल रिसॉर्ट, लातूर येथे झालेल्या Vendor’s Meet मध्ये देश-विदेशातील पुरवठादारांना निमंत्रण देण्यात आले, पण लातूर MIDCतील उद्योगांना मात्र पूर्णतः डावलले गेले. स्थानिक उद्योगांना न काम, न संपर्क, न संधी! मग प्रश्न असा — “मेक इन मराठवाडा” कुठे गेला?
🔹 स्थानिकांचा संतप्त सवाल
“मराठवाड्यातील मुलांना रोजगार मिळवून देण्यासाठी कारखाना स्थापन झाला, पण काम मिळतंय परराज्यातील मुलांना. मग हा प्रकल्प लातूरमध्ये का आणला? लातूरचा वापर केवळ राजकीय जाहिरातीसाठीच झाला का?” — असा सवाल बेरोजगार तरुणांनी उपस्थित केला आहे.
🔹 मागण्या स्पष्ट
- कंपनीने भरती प्रक्रियेचे वेळापत्रक पारदर्शकपणे जाहीर करावे.
- स्थानिक पात्र उमेदवारांना प्राधान्य देणे बंधनकारक करावे.
- MIDCतील लघुउद्योगांना कोच उत्पादनासाठी लागणाऱ्या पार्ट्सचे काम देण्यात यावे.
- राज्य शासनाने प्रकल्पातील स्थानिक रोजगाराची स्थिती तपासणी समितीमार्फत पडताळावी.
🔹 निवडणुका आल्या की रोजगाराचे गाजर दाखवलं जातं
मराठवाडा रेल कोच फॅक्टरी हे लातूरचे औद्योगिक स्वप्न होते — पण आज ते “रोजगाराचा मृगजळ” ठरले आहे. परप्रांतीयांना संधी आणि स्थानिकांना प्रतीक्षा… हीच आजची वस्तुस्थिती.
जर तातडीने शासन व प्रशासनाने या “अन्यायाचे इंजिन” थांबवले नाही, तर मराठवाड्याच्या तरुणांचा विश्वास कायमचा रुळावरून घसरेल!

