
लातूर दि. १२ जाने
देशाच्या उज्वल भवितव्यासाठी व लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे असे प्रतिपादन लातूर शहर महानगरपालिकेचे उपायुक्त पंजाबराव खानसोळे यांनी केले.
महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, समाजकार्य व क्रीडा विभागाच्यावतीने आयोजित मतदान जनजागृती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत ते होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. आनंद शेवाळे हे होते तर विचारमंचावर शिक्षणाधिकारी तथा स्वीप मुख्य समन्वयक श्वेता नागणे, शिक्षण विस्तार अधिकारी मधुकर ढमाले, जिल्हा समन्वयक सतीश भापकर, स्वीप सदस्य पवनकुमार खोत, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. नितीन वाणी, डॉ. संजय गवई, डॉ. यशवंत वळवी, डॉ. शिवप्रसाद डोंगरे, डॉ. रत्नाकर बेडगे, डॉ. गुणवंत बिरादार, प्रा. आशिष स्वामी, प्रा. मारोती माळी आणि नामदेव बेंदरगे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जगतज्योती महात्मा बसवेश्वर, राष्ट्रमाता माँ जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
पुढे बोलताना उपायुक्त पंजाबराव खानसोळे म्हणाले की, सार्वत्रिक निवडणुका ह्या लोकशाहीचा उत्सव असतात. या उत्सवात सर्व सुजान दक्ष नागरिकांनी सहभागी झाले पाहिजे. मतदान हा मतदाराचा संवैधानिक हक्क असून ते आपले कर्तव्य देखील आहेत. तरुणांनी नि:पक्षपातीपणे मतदान केले पाहिजे आणि परिसरातील सर्वांना मतदान करण्यासाठी प्रेरित केले पाहिजे. शंभर टक्के मतदान झाल्यास आपल्या नेतृत्वास आपण प्रश्न विचारू शकतो आणि त्यामुळे आपल्या समस्या निवारण होऊ शकतात असेही ते म्हणाले.
यावेळी स्वीप, रोटरी क्लब ऑफ लातूर होरायझन आणि महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर यांच्यावतीने तयार केलेल्या सेल्फी पॉईंटचे उद्घाटन उपायुक्त पंजाबराव खानसोळे यांनी केले.
अध्यक्षिय समारोपात प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. आनंद शेवाळे म्हणाले की, युवक हा कोणत्याही देशाचा आधारस्तंभ असतो. युवकांनी निवडणूक प्रक्रियेपासून दूर न राहता सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. आपला नेता कटाक्षाने निवडला पाहिजे. युवकांमध्ये क्रांती करण्याची क्षमता असते.
यावेळी अजय राऊत आणि यश आरेकर यांनी मतदान जनजागृतीवर आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मतदान प्रतिज्ञा सर्वाना देण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संजय गवई यांनी केले, सूत्रसंचालन किसनाथ कुडके यांनी केले तर आभार डॉ. शिवप्रसाद डोंगरे यांनी मानले.

