
प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असल्याचे चित्र आता हळूहळू दिसत आहे. परंतु आजही काही क्षेञात महिलांचा सहभाग नगण्य आहे. शरिरसौष्ठव हा एक असाच क्रीडा प्रकार आहे. केवळ पुणे, मुंबई अशा मोठ्या शहरांमध्ये महिला खेळाडूंचा अल्प सहभाग यामध्ये दिसून येतो. लातूर येथे राहणारी स्नेहा सुरेश बरडे ही शरिरसौष्ठव क्रीडा प्रकारात आपला ठसा उमटवताना दिसून येते. स्नेहाचा जीवन प्रवास पाहिल्यानंतर तिच्या धैर्याला, चिकाटीला आणि जिध्दीला सलाम करावा वाटेल.


शिक्षीत असो की अशिक्षित महिलांची स्वप्ने फार मोठी नसतात असे म्हटले जाते. आपले कुटुंबीय हेच विश्व आहे समजणाऱ्या महिलांची संख्या अधिक आहे. उच्च शिक्षण, चांगली नौकरी याकडे सर्वांचा कल असतो. धाराशिव जिल्ह्यातील बेंबळी येथे राहणारी स्नेहा सुरेश बरडे यांचीही फार मोठी स्वप्ने नव्हती. आई, वडील दोघेही नौकरदार, दोन बहिणी आणि एक भाऊ असे कुटुंब असणाऱ्या स्नेहाने शेजारी राहणाऱ्या प्रशांत गोरे यांच्यासोबत २०११ मध्ये प्रेमविवाह केला. स्वत: एम ई मेकॅनिकल चे शिक्षण घेतलेली स्नेहा आपला नवरा आणि मुलीसोबत छान आयुष्य जगत होती.
२९ नोव्हेंबर २०२० रोजी झालेल्या अपघातामध्ये प्रशांतचा मृत्यू झाला. त्यावेळी सव्वातीन वर्षाची मुलगी होती. तब्बल सहा महिने नैराश्याचे जीवन जगत असताना, झोपेसाठी गोळ्या खाव्या लागत होत्या. नवऱ्याच्या अस्थी ही विसर्जन न करता सोबत ठेऊन घेतल्या होत्या. वेड लागल्याची अवस्था झालेली होती. यामधून बाहेर पडण्यासाठी स्नेहाने पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर वाढलेले वजन कमी करण्यासाठी जीम लावलेली होती.


पुण्यात पुन्हा जीम सुरू केली. आणि शरिरसौष्ठव स्पर्धेची माहिती मिळाल्यानंतर त्यात सहभाग नोंदवला. स्पर्धेसाठी शाॅर्ट आणि ब्रा घालून जेव्हा स्टेजवर गेले त्यावेळी स्वतःला आपण काय करतोय असे वाटून रडायला झाले. पण काही तरी वेगळं केल्या शिवाय ओळख निर्माण होणार नाही हे लक्षात घेऊन स्पर्धेत सहभाग घेतला. २०२१ घ्या स्पर्धेत काहीच माहिती नसताना सहभाग घेतला हीच मोठी गोष्ट होती. आई – वडीलांना त्याची माहिती पण नव्हती. भाऊ माञ सोबतीला होता. त्यानंतर यामध्येच करिअर करायचे हे ध्येय ठरवले. २०२२ मध्ये मुंबई येथे राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेतला आणि त्यामध्ये आठवा क्रमांक आला. कोणतेही विशेष प्रशिक्षण घेतलेले नव्हते. स्वतः जीम मध्ये मेहनत करायची आणि स्पर्धेत सहभाग घ्यायचा. त्यानंतर २०२३ मध्ये कोल्हापूर येथे झालेल्या स्पर्धेत ब्राॅंझ पदक पटकावले. त्यामुळे एक वेगळी ओळख निर्माण झाली.


दरम्यान पाठीच्या मणक्यांच्या दुखण्याने डोके वर काढले आणि २०२४ मध्ये शस्ञक्रिया करावी लागली. साडेतीन तासांची शस्त्रक्रिया होती. दोन दिवस व्हेंटिलेटरवर तर पुढील दोन दिवस ऑक्सिजनवर होते.२२ दिवस रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार घेतले . तेंव्हा पुन्हा आपण जीम करु शकणार नाही असे वाटले. परंतु सहा महिन्यांत पुन्हा जीम मध्ये मेहनत सुरू केली.२०२५ च्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तयारी सुरू केली आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याचे ध्येय समोर ठेवले आहे. त्यांच्या पुर्ततेसाठी परिश्रम घेत असल्याचेही स्नेहाने सांगितले. स्वतःचे जीम सुरू करण्याचे नियोजन आहे किंवा काही व्यवसाय सुरू करण्याचा विचार असल्याचे स्नेहाने सांगितले.
नवरा मेलेला , रंडक्या बाईला कशाला जीम हवी असे लोक बोलायचे. कुणासोबत ही नावे जोडायचे यांचा प्रचंड ञास सहन करावा लागला तो शब्दात व्यक्त करता येणार नाही. पण आयुष्यात हारुन बसायचे नाही, स्वतःचे अस्तित्व दाखवून द्यायचे ही जिद्द ठेऊन ठरवलेल्या मार्गावर चालत राहिले अशी भावना ही स्नेहाने व्यक्त केली.
मुलीला जिमनॅस्टिकची खेळाडू म्हणून तयार केले
नवऱ्याच्या मृत्युनंतर सव्वातीन वर्षाची मुलगी अंक्षिका हिचा सांभाळ करत मार्गक्रमण केले. मुलीला जिमनॅस्टिकची खेळाडू म्हणून प्रशिक्षण दिले. सात वर्षांच्या वयात तीने चार स्पर्धा जिंकलेल्या आहेत. दोन वेळा जिल्हा स्तरावर प्रथम येण्याचा बहुमान पटकावला तर राज्य स्तरावर १० व्या क्रमांकावर ती आली. स्वतः च्या करिअर साठी झगडत असतानाच मुलीच्या करिअर कडे डोळसपणे लक्ष देत तीला पण सर्वोत्तम खेळाडू बनविण्याकडे स्नेहाची वाटचाल सुरू आहे.

